`जर तुमच्यात हिंमत असेल तर...,` जया बच्चन नातीच्या कार्यक्रमात संतापल्या; `तुम्हाला लाज वाटली पाहिजे`
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा राग तर आता जगजाहीरच आहे. यावरुन त्यांना सोशल मीडियावर (Social Media) नेहमी ट्रोलही केलं जात असतं. दरम्यान जया बच्चन यांनी नाती नाव्याच्या (Navya Nanda) कार्यक्रमात आपला संताप व्यक्त केला आहे.
अमिताभ बच्चन यांची नात नाव्या नंदाचा पॉडकास्ट शो 'What The Hell Navya' च्या दुसऱ्या हंगामाची घोषणा करण्यात आली आहे. त्याचा टीझर शेअर करण्यात आला असून, जया बच्चन यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जया बच्चन यांनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करणाऱ्यांना जाहीर आव्हान दिलं असून हिंमत असेल आपलं चेहरा दाखवा असं म्हटलं आहे. टीझरमध्ये नाव्या नंदा आपली आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चन यांच्याशी संवाद साधत ट्रोलवर भाष्य करताना दिसत आहे.
"जर तुम्हाला कमेंट करायची असेल तर ते सकारात्मकपणे करा. पण नाही, तुम्हाला फक्त निर्णय ऐकवायचा आहे," असं जया बच्चन बोलत असल्याचं प्रोमोत दिसत आहे. यावर नाव्या म्हणते, "ट्रोल करणारे तुझ्यासमोर बसून बोलण्याची हिंमत करणार नाहीत". त्यावर जया बच्चन लगेच म्हणतात की, "त्यांच्यात तितकी हिंमतच नाही". त्यावर नाव्या उपहासात्मकपणे तुझ्यासमोर नक्कीच नाही असं म्हणते.
या प्रोमोत जया बच्चन ट्रोलर्सना महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करण्याचं आणि आपला चेहरा दाखवण्याचं आव्हानच दिलं आहे. "जर तुम्ही खरंच शूर असाल तर निगडीत मुद्द्यांवर कमेंट करा आणि आपला चेहरा दाखवा," असं जया बच्चन म्हणतात. नाव्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटला हा टीझर शेअर केला आहे. सोबत लिहिलं आहे की, "तयार व्हा, सामाजिक वेडेपणाचा हा खडतर प्रवास आहे. उद्या 7 वाजता नवा एपिसोड भेटीला येत आहे".
अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा राग तर आता जगजाहीरच आहे. फोटोग्राफर्सवर तर त्या नेहमीच चिडत असतात. यावरुन त्यांना सोशल मीडियावर (Social Media) नेहमी ट्रोलही केलं जात असतं. त्यांच्यावर अनेक मीम्सही आहेत. जया बच्चन यांनी यावर व्यक्त होताना, लोक आपल्यावर हसतात याचं वाईट वाटत नाही, पण ते मीम्स फार वाईट आहेत असं म्हटलं आहे. माझ्यावर मीम्स तयार होत असल्याने मी एकाप्रकारे त्यांचं पोटच भरत आहे असंही उपहासात्मकपणे त्यांनी म्हटलं.
जया बच्चन म्हणाल्या की, "लोक माझी खिल्ली उडवत असतील किंवा माझ्यावर हसत असतील तर मला काही आक्षेप नाही. पण लोक ते मीम्स तयार करतात ते फार वाईट आहे. त्यांनी ते योग्य प्रकारे केलं पाहिजे". यावर नाव्याने तू त्यांना शिकवलं पाहिजे असं म्हटलं. त्यावर जया बच्चन यांनी मी का त्यांना शिकवावं? अशी विचारणा केली.
अलीकडेच, नातू अगस्त्य नंदा यांच्या 'द आर्चीज' या डेब्यू चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या वेळी, जया बच्चन यांनी फोटोग्राफर्सना फटकारलं होतं. जया बच्चन यांनी त्यांना ओरडू नका असं बजावलं होतं. 2022 मध्ये, जया बच्चन यांनी 'व्हॉट द हेल नव्या'च्या एका एपिसोडमध्ये पापाराझीबद्दल नापसंती व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या होत्या, "मला त्यांचा तिरस्कार आहे. जे लोक तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतात आणि ती उत्पादने विकून पोट भरतात त्यांचा मी तिरस्कार करते. मला अशा लोकांचा तिरस्कार आहे. मी त्यांना नेहमी सांगते की तुम्हाला लाज वाटत नाही का?."