आहे ते ठिक आहे; मुलीची खिल्ली उडवणाऱ्यांना ‘जेठालाल’चं उत्तर
हे क्षण अर्थातच दिलीप यांच्यासाठी अतिशय भावूक करणारे होते.
मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेते दिलीप जोशी, म्हणजेच सर्वांचे लाडके ‘जेठालाल’ यांची मुलगी नियती जोशी हिचा विवाहसोहळा पार पडला. अतिशय थाटामाटात आणि राजेशाही अंदाजात नियतीचा लग्नसमारंभ पार पडला. हे क्षण अर्थातच दिलीप यांच्यासाठी अतिशय भावूक करणारे होते.
नियतीच्या लग्नसोहळ्याची बरीच चर्चा झाली. अगदी तिच्या पतीपासून ते तिच्या लूकपर्यंत. इथं लूकवर जास्त जोर देण्यात आला. कारण कमी वयातच पांढरे झालेले केसही तिनं लग्नात मोठ्या तोऱ्यात मिरवले.
काहींना नियतीचा हा निर्णय पटला, तर काहींनी तिची खिल्ली उडवली. पण, आपल्या मुलीचा हा निर्णय कधीच इतका मोठा मुद्दा नव्हता असं जोशी यांनी स्पष्ट केलं.
जे जसं आहे, ते तसंच ठिक आहे...
आपल्या मुलीच्या या निर्णयाबाबत सांगताना जे जसं आहे ते तसंच राहिलं पाहिजे, असं जोशी म्हणाले. आपण जसे आहोत तसंच जगासमोर आलं पाहिजे हीच त्यांची भूमिका. नियती ही एक सर्वसामान्य आयुष्य जगणारी मुलगी आहे असं ते म्हणाले.
सोशल मीडियावरी ट्रोलिंग पाहता ही बाब काही आपल्या नियंत्रणात नाही ही वस्तूस्थिती जोशी यांनी मांडली. उलटपक्षी नियतीच्या निर्णयाची प्रशंसा करणाऱ्यांप्रती त्यांनी आभाराची भावना व्यक्त केली.
नियतीच्या निर्णयाचा पाठिंबा देणाऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता याची आपण अपेक्षाही केली नसल्याचं ते म्हणाले. मुलीच्या निर्णयानं इतरांनाही प्रेरणा मिळाली हे पाहून जोशी यांनी आनंद व्यक्त केला.