Nandamuri Taraka Ratna : दाक्षिणात्य अभिनेते ज्युनियर एनटीआर (Jr NTR) यांचे चुलत भाऊ आणि तेलुगु देसम पक्षाचे नेते नंदामुरी तारका रत्न यांचे (Nandamuri Taraka Ratna Death) निधन झाले आहे. 39 वर्षीय नंदामुरी यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. नंदामुरी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतही शोककळा पसरली आहे. अल्लू अर्जुन, चिरंजीवी यांच्यासह इतर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी नंदामुरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाध्ये नंदामुरी यांना हृदयविकाराचा झटका आला होता तेव्हापासून ते कोमात होते. त्यांना बंगळुरू येथील नारायणा हृदयालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंदामुरी यांचे सर्व नातेवाईक, चाहते आणि राजकारणी त्यांना रुग्णालयात भेटण्यासाठी पोहोचत होते आणि त्यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करत होते. मात्र त्यांनी शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.



आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे एका राजकीय सभेदरम्यान तारक रत्न यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 27 जानेवारी रोजी कुप्पम येथे टीडीपीचे सरचिटणीस नारा लोकेश यांच्या राज्यव्यापी 'पदयात्रे'च्या शुभारंभाच्या वेळी हा सर्व प्रकार घडला होता. जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तारका रत्न यांना पुढील उपचारासाठी बेंगळुरू येथील नारायण हृदयालयात नेण्यात आले होते.


अभिनेता महेश बाबूनेही नंदामुरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  "तारकरत्न यांच्या अकाली निधनाने धक्का बसला आणि खूप दुःख झाले. भाऊ खूप लवकर गेला... या दुःखाच्या प्रसंगी माझ्या प्रार्थना त्यांचे कुटुंबीय आणि प्रियजनांसोबत आहेत," असे महेश बाबूने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.



राजकारणात येण्यापूर्वी तारक रत्न यांनी काही तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले होते. 'ओकातो नं. कुर्राडू' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. मात्र ज्युनियर NTR प्रमाणे त्यांना यश मिळाले नाही. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी, टीडीपी प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू, अभिनेते चिरंजीवी, केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी आणि इतर नेत्यांनी तारका रत्न यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.