मुंबई : "रे राया.... कर धावा"  या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे, चित्रपटातील गाण्यांना बॉलीवूडच्या गायकांचा स्वरसाज मिळाला आहे. कैलाश खेर, जावेद अली यांनी गाणी गायली आहेत. राधे मोशन पिक्चर्सनं या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. अजय सुखेजा यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून अनिता संजय पोपटानी या कार्यकारी निर्मात्या आहेत. नुकताच  या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटात एकूण तीन गाणी असून ही गाणी मिलिंद शिंदे यांनी लिहिली आहेत. "जाऊ कुणीकडे", "दगड ओठ" या दोन गाण्यांसह "रे राया...हे टायटल साँग खास आहे. संगीतकार मंगेश धाकडे यांनी ही गाणी संगीतबद्ध केली आहेत. गायक जावेद अली, कैलाश खेर यांच्यासह वैशाली भैसने माडे, मंगेश धाकडे यांनी ही गाणी गायली आहेत.



 'मी गायलेल्या गाण्याचे शब्दच इतके दमदार आहेत, की गाणं ऐकल्यावर ते मला गावंसंच वाटलं. हे गाणं नक्कीच ऐकणाऱ्याच्या मनाचा ठाव घेईल. अस्सल मराठी मातीतलं असं हे गाणं आहे. महाराष्ट्राला मोठी सांगीतिक आणि साहित्य परंपरा आहे. मराठी संगीताला पूर्वीपासूनच एक प्रकारची उंची आहे. आताच्या काळात तयार होणारं संगीतही तीच परंपरा पुढे घेऊन जात आहे. अर्थपूर्ण, ह्रदयाला भिडणारे शब्द आणि संस्कृतीशी नातं सांगणाऱ्या संगीतानं मराठी संगीत अधिक लोकप्रिय होऊ लागलं आहे, ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे, असं कैलाश खेर यांनी सांगितलं.


चित्रपटाची कथा पटकथा संवाद हे  किरण बेरड यांनी लिहिले आहेत. प्रताप नायर यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे तर अमित सोनावणे यांनी संकलन केले आहे.अभिनेता भूषण प्रधान, संस्कृती बालगुडे, उदय टिकेकर, प्रकाश धोत्रे, नयन जाधव, सुदर्शन पाटील यांच्यासह  राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विवेक चाबुकस्वार, हंसराज जगताप यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. ग्रामीण भागातल्या मुलांचा धावपटू होण्याचा प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे. भूषण प्रधान अॅथलेटिक्स प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या २०  जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार  आहे.