मुंबई: अवघ्या काही तासांवर येऊ घातलेल्या हॉकी विश्वचशकाच्या पार्श्वभूमीवर एकिकडे सर्व तयारी शेवटच्या टप्प्यावर असताना या विश्वचषकाच्या प्रसिद्धीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अभिनेता शाहरुख खानला मात्र काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. ओडिशा येथील कलिंग सेनेकडून शाहरुखचा विरोध केला जात असून काही दिवसांपूर्वीच त्याच्यावर शाई फेकण्याची धमकीही देण्यात आलेली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी कलिंग सेनेने हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांच्या मागणीनंतर ही धमकी मागेही घेतली. 


'हॉकी इंडियाच्या अध्यक्षांच्या विनंतीनंतर आम्ही ही धमकी मागे घेत आहोत. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्याशिवाय शाहरुख या हा कार्यक्रमाचा चेहरा आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारचं आंदोलन करायचं नाही, ज्यामुळे ओडिशाचं नाव खराब होईल', असं कलिंग सेना प्रमुख हेमंत रथ म्हणाल्याचं वृत्त 'हिंदुस्तान टाईम्स'ने प्रसिद्ध केलं आहे. 


कलिंग सेनेकडून शाहरुखला देण्यात आलेली धमकी मागे घेण्यात आली असली तरीही १७ वर्षांपूर्वी त्याच्याकडून झालेली चूक ते अद्यापही विसरलेले नाहीत. ज्यामुळे त्याने माफी मागण्याचीही त्यांची अपेक्षा आहे. शाहरुखच्या 'अशोका' या चित्रपटातून इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडत ओडिशा या राज्याच्या भावना दुखावल्या गेल्याचे आरोप त्याच्यावर करण्यात आले होते. 


दरम्यान, यासाठी किंग खानने कलिंग युद्ध चुकीच्या पद्धतीने दाखवत राज्याचील जनतेच्या भावना दुखावल्या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी कलिंग सेनेकडून करण्यात आली आहे. यावर आता शाहरुखची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


काही दिवसांपूर्वीच कलिंग सेनेकडून शाहरुखला देण्यात आलेली धमकी मागे घेण्यात यावी अशी मागणी हॉकी इंडियाकडून एका पत्रकाद्वारे करण्यात आली होती. शाहरुख खान विश्वचषकाच्या उदघाटन सोहळ्याच्या वेळी उपस्थित राहणार असल्यामुळे कोणतीही चुकीची घटना टाळण्यासाठी हॉकी इंडियाकडून ही काळजी घेण्यात आली . 


'कोणा एका आमंत्रितावर अशा प्रकारे शाई वगैरे फेकणं हे आपल्या भारत देशालाही शोभणारं नाही. त्याशिवाय ओडिशाकडे पाहण्याचा आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचा दृष्टीकोनही बदलेल', असं म्हणत त्यांनी कलिंग सेनेकडून होणारा विरोध काही बाबतीत शमवण्याचा प्रयत्न केला.