मुंबई: आलिया भट्ट हिच्यासारख्या सामान्य अभिनेत्रीशी तुलना होणे माझ्यासाठी अत्यंत शरमेची गोष्ट आहे, असे वक्तव्य बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने केले. बॉलिवूड लाईफ या संकेतस्थळाने २०१९ मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण, यासाठी एक सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये कंगना रानौत ३७ टक्के मते मिळवून विजयी झाली. तर आलियाला ३३ टक्के मतांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. बॉलिवूड लाईफने याविषयी कंगनाला प्रतिक्रिया विचारली तेव्हा तिने म्हटले की, मला अत्यंत शरम वाटत आहे. आलियाच्या 'गली बॉय'मधील भूमिकेला मात देण्यासारखे त्यामध्ये काय होते? बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये असते तशीच फटकळ स्वभावाची मुलगी 'गली बॉय'मध्ये होती. बॉलिवूडच्या लेखी चांगला अभिनय आणि महिला सबलीकरणाची हीच व्याख्या आहे. प्रसारमाध्यमांना सेलिब्रिटी घराण्यांतून आलेल्या मुलांचे फारच कौतुक असते. मात्र, प्रसारमाध्यमांनी अशा सामान्य भूमिकांचे इतके कौतुक करणे थांबवले पाहिजे. अन्यथा अभिनयाचा मापदंड कधीच पुढे सरकणार नाही, असे कंगनाने सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी कंगना राणौतचा 'मणकर्णिका' हा चित्रपट चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. मात्र, एरवी महिला सबलीकरणाचा कैवार घेणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी या चित्रपटाविषयी कौतुकाचे चार शब्दही न काढल्याने कंगना नाराज झाली होती. आमिर खान आणि आलिया भट्ट यांच्यासारखे कलाकार स्वत:च्या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी आपल्याला आवर्जून जाहीर मतप्रदर्शन करायला सांगतात. मात्र, 'मणकर्णिका'साठी हीच तत्परता त्यांनी दाखवली नाही, असे कंगनाने म्हटले होते. 


यावर आलियाने अत्यंत संयत प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मी कंगनाइतकी परखडपणे मतं मांडू शकत नाही. मी यासाठी खरंच तिचा फार आदर करते. एका अर्थी तिचं म्हणणं अगदी योग्यच आहे. अनेकदा आम्ही व्यक्त होत नाही. माझे वडीलही म्हणतात की, आधीच अनेकांनीच आपली मतं मांडली आहेत. त्यामुळे कोणी एकाने मतप्रदर्शन केले नाही तर त्याने फारसा फरक पडणार नाही. अर्थात माझीही मते आहेत. पण, ती मते माझ्यापुरतीच सिमीत ठेवत असल्याचे आलियाने सांगितले.