करणी सेनेच्या धमकीनंतर `मणिकर्णिके`च्या सुरक्षेत वाढ, सात जण तडीपार
करणी सेनेनं आंदोलन करत कायदे तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय
मुंबई : बॉलिवूड क्वीन 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रदर्शनासाठी सज्ज झालीय. हा सिनेमा २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. परंतु, सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी करणी सेनेनं घेतलेल्या आक्षेपामुळे मोठा वादंग उभा राहिलाय. मुंबई करणी सेनेनं कंगनाला धमकी दिल्यानंतर तिच्या घरासमोर पोलिसांची कुमक तैनात करण्यात आलीय. आज सकाळी करणी सेनेनं कंगनाला, माफी मागितली नाही तर घराबाहेर आंदोलन करणार' असल्याची धमकी दिली.
पोलिसांनी करणी सेनेला आंदोलनाची परवानगी नाकारलीय. करणी सेनेनं आंदोलन करत कायदे तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, दोन दिवसांपूर्वी जुहू पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानंतर करणी सेनेच्या सात सदस्यांवर तडीपारीची कारवाई केलीय. सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत या सात जणांना शहरात बंदी घालण्यात आलीय.
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय महासचिव आनंदसिंग ठोके यांनी मात्र, आपल्याला मणिकर्णिका या सिनेमावर कोणताही आक्षेप नसल्याचं म्हटलं. परंतु, कंगनानं करणी सेनेबद्दल वापरलेल्या 'धुळीस मिळवून टाकेन' या वाक्यावर आक्षेप असल्याचं त्यांनी म्हटलंय. याबद्दल कंगना आपली माफी मागणार नाही तेव्हापर्यंत तिच्याविरुद्ध आंदोलन करणार असल्याचं करणी सेनेनं म्हटलंय.
करणी सेनेकडून धमक्या मिळाल्यानंतर ते असाच त्रास देत असतील तर आपण त्यांना धुळीला मिळवून टाकू, असं वक्तव्य कंगना रानौत हिनं केलं होतं.