देशातील मुली तुम्हाला माफ करणार नाहीत; कंगनाचं राऊतांना प्रत्युत्तर
९ सप्टेंबर रोजी कंगना मुंबईत येणार आहे.
मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौतला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी चांगलेच सुनावले आहे. हा वाद आता अत्यंत टोकाला जावून पोहोचला आहे. शिवाय कंगना आणि संजय राऊत यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाप्रती अपशब्द वापरल्यामुळे कंगनाने त्यांना ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं. देशातील मुलगी तुम्हाला माफ करणार नाही, असं म्हणतं तिन राऊतांवर टीका केली आहे.
तिने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 'संजयजी तुम्ही एक मंत्री आहात. तरी देखील तुम्ही माझ्याबद्दल अपशब्द वापरले. आज या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रत्येक तासाला अनेक महिलांवर बलात्कार अत्याचार होत आहेत. याला जबाबदार फक्त मानसिकता आहे. ज्याचं प्रदर्शन तुम्ही आज सर्वांसमोर केलं आहे. त्यासाठी देशातील मुलगी तुम्हाला माफ करणार नाही.'
अभिनेता आमिर खान नसरुद्दीन शाह यांना देशात राहण्याची भीती वाटते पण त्यांच्या विरोधात कोणी अपशब्द काढत नाही. मी कायम मुंबई पोलिसांचं कौतुक करते. मात्र पालघर मधील साधु हत्या किंवा सुशांत आत्महत्या प्रकरणी मी त्यांची टीका केली, तर ते माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. असं देखील ती म्हणाली.
दरम्यान ९ सप्टेंबर रोजी कंगना मुंबईत येणार आहे. 'मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. तुमचे लोक मला ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. तुम्ही मला माराच... कारण या देशाचे कर्ज रक्त सांडूनच पूर्ण करता येईल.' शिवाय तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही असं म्हणत तिने संजय राऊतांना आव्हान दिलं आहे.