कनिकाची पाचवी चाचणी पॉझिटिव्ह, परिस्थिती अद्यापही...
लखनऊमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह आली आहे. दरम्यान चाचणी पॉझिटीव्ह असली तरी तिच्या परिस्थीत सुधारणा होत असल्याचा खुलासा डॉक्टरांनी केला आहे. प्रत्येक ४८ तासांनंतर कोरोना रुग्णाची चाचणी करण्यात येते. सध्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये कनिकावर उपचार सुरू आहेत. संस्थेचे संचालक प्राध्यापक आर.के धिमान यांनी तिची परिस्थिती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
जेव्हा कनिकाची चौथी चाचणी पॉझिटीव्ह आली होती तेव्हा तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मला माझ्या कुटुंबाची फार आठवण येत आहे, आशा करते की माझी पुढील चाचणी निगेटिव्ह येईल. अशी पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर केली होती. आता देखील तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आरोग्याबद्दल माहिती चाहत्यांना दिली.
लंडनहून परतल्यानंतर कनिकाला अस्वस्थ वाटू लागलं. ज्यानंतर तिला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं गेलं. पण, अद्यापही तिचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्हच येत असल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्य केली आहे.
गायिका kanika kapoor कनिका कपूर हिला कोरोनाची लागण झाल्याचं उघड होताच तिच्या संपर्कात आलेल्या संभाव्य व्यक्तींची यादी तयार करत त्यांची कोरोनासाठीची चाचणी करण्याची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारच्या आरोग्य विभागाने घेतली.