`तू माझ्यातच आहेस... चिरु`; गर्भवती पत्नीची दिवंगत अभिनेत्यासाठी भावनिक पोस्ट
त्या तीन महिन्यांच्या गर्भवती असून...
मुंबई : काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेता चिरंजीवी सारजा यांनी जगाचा निरोप घेतला. ज्यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून दु:ख व्यक्त करण्यात आलं. सध्या पुन्हा एकदा चिरंजीवी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे ती म्हणजे त्यांच्या पत्नीनं म्हणजेच मेघना राज यांनी लिहिलेल्या एका भावनिक पोस्टमुळं.
तीन महिन्यांच्या गर्भवती असणाऱ्या मेघना यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या एका अशा टप्प्याविषयी भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे, जिथे तिनं चिरंजीवी आपल्यासोबतच असल्याचं म्हणत त्याच्या आठवणी जागवल्या.
मेघना यांनी पोस्टमध्ये लिहिलं,
'चिरु, मी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला रे. पण, मला जे काही सांगायचं आहे ते शब्दांत मांडण्यास मी असमर्थ आहे. या जगातील सारे शब्द जरी एकत्र आणले तरीही तुझं महत्त्वं मी व्यक्त करु शकत नाही. माझा मित्र, प्रेमी, माझा साथीदार, माझं बाळ, माझा आत्मविश्वास आणि माझा पती; तू या साऱ्याहूनही माझ्यासाठी अधिक महत्त्वाचा होतास. तू माझ्याच आत्म्याच्या एक भाग होतास चिरु.
कायम दाराकडे पाहिल्यावर आणि तू बेबीssss, मी आलो असं अक्षरश: ओरडत घरी येत नाहीस तेव्हा कधीही न भरुन निघणाऱ्या वेदनेची जाणीव माझ्या आत्म्याला होते. तुला स्पर्श न करता येण्याच्या भावनेने माझं मन हेलावून जातं. जणू ते हळुवारपणे मृतावस्थेतच जात आहे. पण, अचानकच जादू होते आणि तुझ्या अस्तित्वाची जाणीव मला होते. जेव्हा जेव्हा मला कमकुवत असल्यासारखं वाटतं तेव्हा तू एका देवदूताप्रमाणे माझ्या बाजूलाच असल्याची जाणीव होते. तुझं माझ्यावर इतकं प्रेम आहे की तू मला एकटीला सोडणारच नाहीस. नाही ना सोडणार? आपलं बाळ हे माझ्यासाठी तुझ्याकडून मिळालेली एक मौल्यवान भेट आहे. आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. या अद्वितीय अविष्कारासाठी मी तुझी आभारी आहे. आपल्या बाळाच्या रुपात तुला पुन्हा या पृथ्वीवर आणण्यासाठी मी आतुर झाले आहे. तुला पुन्हा स्पर्श करण्यासाठी आतुर झाले आहे. तुझं ते स्मित पाहण्यासाठी, तुझं खळखळून हसणं अनुभवण्यासाठी मी आतुर झाले आहे. मी तुझी आणि तू माझी त्या तीरावर वाट पाहत राहशील.
माझा श्वास सुरु असेपर्यंत तुझं अस्तित्वं असेल. कारण तु माझ्यातच आहेस. माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे चिरु'.
मेघना राज यांनी लिहिलेली ही पोस्ट वाचतानाच मन हेलावून टाकत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मन मोकळं करणाऱ्या मेघना यांना चाहत्यांनीही दिलासा देत त्यांच्यासोबत या कठीण प्रसंगात आधार होऊन उभं राहण्याचा विश्वास दिला.