नवी दिल्ली : नुकतंच प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मानं आपल्या ट्विटर अकाऊंटवर लवकरच 'द कपिल शर्मा शो' घेऊन परतण्याची घोषणा केलीय. आता, कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबरी आहे... मीडियातून मिळालेल्या माहितीनुसार, कपिल शर्मा लवकरच गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्रजी दैनिक मुंबई मिररनं कपिलच्या मित्राच्या सूत्रानुसार ही बातमी दिल्याचं म्हटलंय. या विवाहाचं आयोजन त्यांच्या गावात अर्थात पंजाबमध्ये होणार आहे. विवाहाचा कार्यक्रम तब्बल चार दिवस चालणार आहे. यासाठी सिने आणि टीव्ही इंडस्ट्रीतल्या अनेक दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवम्यात येतेय. लग्नानंतर कपिल मुंबईतही एका पार्टीचं आयोजन करणार असल्याचं सांगण्यात येतंय. 


काही महिन्यांपूर्वी कपिल आपल्या गर्लफ्रेंडसोबत ग्रीसमध्ये सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. कपिलनं यापूर्वीही अनेकदा गर्लफ्रेंड गिन्नीबद्दल आपलं प्रेम उघडपणे व्यक्त केलंय. 'गिन्नीला माझी बेटर हाफ म्हणून नका, कारण तीच मला पूर्ण करते... लव्ह यू गिन्नी...' असं ट्विट करत कपिलनं काही दिवसांपूर्वी आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. 


प्रोड्युसर म्हणूनही कपिल लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. 'सन ऑफ मंजीत सिंह' हा त्याचा सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित झालाय.