मुंबई : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती, 'कारभारी लयभारी' या मालिकेच्या प्रोमोची... झी मराठीवर 'कारभारी लयभारी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या प्रोमोत एका राजकीय पक्षाची सभा आणि त्या सभेला संबोधित करणारा नेता दाखवण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भर पावसात एक नेता सभेला संबोधित करत आहे. 'अरे ही माणसं आमची आहेत. हा महाराष्ट्र आमचा आहे. मग सत्ता पण आमची. आम्ही का जायचं त्यांच्या दारात; ते येतील आमच्या दारी. आम्ही इथले कारभारी.... ' असे या भाषणातील बोल आहे. 


या प्रोमोची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. 'कारभारी लयभारी' ही मालिका राजकीय वर्तुळावर भाष्य करेल का? असा प्रश्न देखील काही प्रेक्षकांना पडला आहे. एवढंच नव्हे तर या मालिकेतील ही भूमिका कोणता कलाकार साकारत आहे? यावर देखील प्रेक्षकांनी आपली मत मांडली आहे. 


अभिनेता आणि खासदार अमोल कोल्हे आहेत का? असा सवाल देखील सोशल मीडियावर विचारला जात आहे. तर काहींनी अभिनेता राजेश श्रृंगारपुरे असल्याचं म्हटलं आहे. 'कारभारी लयभारी' या मालिकेचा हा पहिलाच प्रोमो आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता तर ताणलीच आहे. पण तुर्तास आपण दुसऱ्या प्रोमोची वाट पाहूया.