मुंबई : सोशल मीडिच्या माध्यमातून अनेकदा सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये असणारं सुरेख असं नातं पाहायला मिळतं. यावेळीसुद्धा अशाचं एका नात्याची सुरेख बाजू पाहायला मिळत आहे. हे नातं जरा जास्त खास आहे, कारण ते थेट देशाभिमानाशी जोडलं गेलं आहे. हे ट्विट केलं आहे कारगिल युद्धात सहभागी झालेल्या मेजर डी.पी. सिंग यांनी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक ट्विट करत मेजर सिंग यांनी आमिरलाही भावूक केलं. ज्यामध्ये त्यांनी आपल्यासोबत 'ऑपरेशन विजय' दरम्यान झालेल्या अपघाताचाही उल्लेख केला. भारताचे पहिले ब्लेड रनर म्हणून ओळख असणाऱ्या सिंग यांनी ट्विटमध्ये लिहिलं, ''बरोबर २० वर्षांपूर्वी मी आमिर खानचा 'सरफरोश' हा चित्रपट पाहिला होता. मी आजही तेच केलं. पण, तेव्हा मी तो चित्रपटगृहात पाहिला होता आणि आता टीव्हीवर पाहिला. तेव्हा मला दोन्ही पाय होते..... आज त्यातील एक कमी आहे. ऑपरेशन विजयसाठी जाण्यापूर्वी पाहिलेला तो माझा शेवटचा चित्रपट होता'', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं. 



मेजर सिंग यांचं हे ट्विट पाहून परफेक्शनिस्ट आमिरही भावूक झाला, पण यावेळी यामध्ये अभिमानाच्या भावना वरचढ ठरल्या होत्या. त्याने या ट्विटला उत्तर देत लिहिलं, 'तुमची ही पोस्ट वाचून माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. तुमच्या धैर्याला, शौर्याला मी सलाम करतो. तुमचा आम्हाला खूप अभिमान आहे....सर' परफेक्शनिस्ट आमिरच्या या ट्विटबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्याने असेच प्रोत्साहनपर चित्रपट साकारावेत अशी विनंती मेजर सिंग यांनी केली. 




सोशल मीडियावर सिनेअभिनेता आणि सैन्यदल अधिकारी यांच्यात झालेला हा संवाद संपूर्ण कलाविश्वात चर्चेचा विषय ठरला. आमिरची मुख्य भूमिका असणाऱ्या सरफरोश या चित्रपटाविषयी सांगावं तर, आजही या चित्रपटाचा चाहता वर्ग तसूभरही कमी झालेला नाही. फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या चित्रपटातून अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि नसिरुद्दीन शाह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळाल्या होत्या.