`चेन्नई एक्स्प्रेस` निर्मात्याच्या मुलीला कोरोनाची लागण
बॉलिवूडमध्ये कोरोनाची लागण झालेली ही दुसरी व्यक्ती आहे.
मुंबई : अभिनेता शाहरूख खान स्टारर 'चेन्नई एक्स्प्रेस' चित्रपटाचा निर्माता करीम मोरानीच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. शाजिया कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. नुकताच शाजियाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. शाजियाला कोरोना झाल्याचं कळताच तिच्या कुटुंबीयांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. बॉलिवूडमध्ये कोरोनाची लागण झालेली ही दुसरी व्यक्ती आहे. कोरोनाचा फैलाव सध्या मोठ्या प्रमाणावर होत आहे.
एका इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार शाजियाला कोरोनाची लागण झाल्याचं कळताचं तिला तात्काळ नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर आता आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर आहे. शिवाय तिच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होतील अशी आशा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
त्याचप्रमाणे पाच चाचण्यानंतर गायिका कनिका कपूरचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. कनिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून तिला घरी सोडण्यात आलं आहे. मात्र पुढील १४ दिवस कनिकाला होम क्वारंटाइन राहण्यास सांगितलं आहे.
आतापर्यंत संपूर्ण जगात १,२७४,१९९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तब्बल ६९,४६८ लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे २६४,८३३ रुग्ण या धोकादायक आजारातून सुखरूप बाहेर पडले आहेत.