मॉडेलचा विनयभंग केल्याप्रकरणी करणी सेनेच्या प्रमुखाला अटक; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Karni Sena : मॉडेलच्या आरोपांनंतर मुंबई पोलिसांनी करणी सेनेच्या नेत्याला अटक केली आहे. मॉडेलने आरोपीच्या विरोधात विनयभंग (molestation) आणि छळ केल्याचे अनेक गंभीर आरोप केले आहेत.
Surjit Singh Rathore : करणी सेनेचे (Karni Sena) नेते सुरजित सिंह राठोड यांना शनिवारी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. सुरजित सिंहवर एका मॉडेलने विनयभंग (molestation) आणि छळ केल्याचे अनेक गंभीर आरोप केले आहेत. या महिला मॉडेलने सुरजित सिंह राठोडच्या विरोधात मुंबईतील बांगूर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलिसांनी सुरजित सिंगला अटक केली आहे.
मॉडेलच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी करणी सेनेचे नेते सुरजित सिंह राठोर यांना अटक केल्याचे म्हटले आहे. आयपीसीच्या कलम 354(a)(d), 500,509,501,67 अंतर्गत बांगुर नगर पोलीस ठाण्यात सुरजीत विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मॉडेलने दिलेल्या विनयभंगाच्या पोलिसांनी सुरजित सिंह यांना अटक केली आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एका मॉडेलच्या तक्रारीच्या आधारे बांगूर नगर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे. तक्रारदार मॉडेलच्या आरोपांनुसार डिसेंबरमध्ये आरोपी सुरजित सिंहने तिचे खोटे इंस्टाग्राम अकाउंट बनवून नातेवाईक, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना अपमानास्पद आणि अश्लील मेसेज पाठवले होते. यानंतर मॉडेलने थेट पोलिसांत धाव घेतली होती.
सुरजित सिंह राठोर यांचा चित्रपटसृष्टीशीही जवळचा संबंध आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातही सुरजित सिंहची खूप चर्चा झाली होती. सुरजित सिंहने दावा केला होता की, रिया चक्रवर्तीला तो 15 जून 2020 रोजी कपूर हॉस्पिटलच्या शवागारात घेऊन गेला होता. पोस्टमॉर्टमनंतर सुशांतचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता. तसेच अखिल भारतीय राजपूत करणी सेनेचे सदस्य सुरजित सिंह राठोड यांनी सांगितले होते की, सुशांतचा चुलत भाऊ आणि आमदार नीरज सिंह बबलू याच्या जवळचा आहे. यासोबतच त्याने सुशांत सिंह राजपूतचा मित्र आणि निर्माता संदीप सिंगवरही अनेक गंभीर आरोप केले होते.