प्रसिद्ध कथक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं निधन
कलाकारांना मोठा धक्का...
मुंबई : प्रसिद्ध कथक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे सर्व कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. पद्मविभूषण पुरस्कार विजेते बिरजू महाराज यांनी रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली.
पंडित बिरजू महाराज यांचं कथक नृत्यामधील योगदान फार मोलाचं आहे. दरवर्षी मे महिन्यात होणाऱ्या महाराजजींच्या वर्कशॉपला कथक कलाकार मोठ्या संख्येने हजेरी लावायचे. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे वर्कशॉप झालं नाही आणि आता त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे सर्व कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.
1983 साली महाराजजींचा जन्म झाला आणि आज ते लाखो कथक कलाकारांना पोरकं करून गेले. ते लखनऊ घराण्याचे होते. पंडित बिरजू महाराज हे कथ्थक नर्तक तसेच शास्त्रीय गायक होते. पंडित बिरजू महाराज यांचे वडील आणि काका देखील कथक नर्तक होते.
महाराजजींचं नाव भारतातील महान कलाकारांमध्ये समाविष्ट आहे. जगभरात त्यांचे लाखो आणि करोडो चाहते आहेत. गायिका मालिनी अवस्थी आणि अदनान सामी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.