मुंबई : होळीच्या दिवशी प्रदर्शित झालेला बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसला आपल्या रंगात रंगवून टाकत वर्षातील सर्वाधिक ओपनिंग केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 वर्षातील सर्वात मोठी ओपनिंग असलेला चित्रपट म्हणून रणवीर सिंहचा 'गली बॉय' चित्रपट पहिल्या क्रमांकावर होता. परंतु 21 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारचा 'केसरी' सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. 'बॉक्स ऑफिस इंडिया'ने दिलेल्या अहवालानुसार, चित्रटाने पहिल्या दिवशी 21.50 कोटी रूपयांची कमाई करत धमाकेदार ओपनिंग केली आहे. या ओपनिंगसोबतच अक्षय कुमारने पुन्हा एकदा बॉलिवुड खिलाडी असल्याचे सिद्ध केलं आहे. चित्रपट निर्माता करण जौहरने आपल्या सोशल मीडियावरून ही खुशखबर शेअर केली आहे. 




ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनीही याबाबत माहिती दिली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 21.50 कोटी रूपयांची सर्वाधिक ओपनिंग करत 'गली बॉय'ला दुसऱ्या स्थानावर टाकले आहे. 'गली बॉय'ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 19.40 कोटी रूपयांची कमाई केली होती. तर सर्वाधिक ओपनिंगमध्ये 'टोटल धमाल' तिसऱ्या स्थानावर असून 'टोटल धमाल'ने पहिल्या दिवशी 16.50 कोटी रूपयांचा गल्ला जमवला होता. 




अक्षय कुमारच्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक ओपनिंगच्या रांगेत 'केसरी' दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 'गोल्ड' चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. 21 मार्च रोजी 'केसरी' देशभरात 3600 स्क्रीन आणि देशाबाहेर 600 स्क्रीनवर रिलीज करण्यात आला होता. पहिल्याच दिवसाच्या दमदार कमाईनंतर चित्रपट लवकरच 100 कोटींचा आकडा पार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.