रावण शिवभक्त ब्राह्मण...; केतकी चितळेकडून रावणाचा `श्री` म्हणून उल्लेख म्हणाली...
Ketaki Chitale Reaction On AdiPurush: आदिपुरुष चित्रपट रिलीज होतात वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता केतकी चितळेनही यावर पोस्ट केली आहे.
मुंबईः अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही तिच्या बेधडक वक्तव्यामुळं चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती अनेकदा विविध विषयांवर पोस्ट करते. तर, तिच्यावर केल्या जाणाऱ्या टीकेलाही ती बेधडक उत्तरे देते. अलीकडेच केतकीने ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित आदिपुरुष (AdiPurush) या चित्रपटाबाबत मत मांडले आहे. चित्रपटातील खटकलेल्या गोष्टींबाबत केतकीने परखडपणे मत मांडले आहे. सोशल मीडियावर केतकीने ही पोस्ट लिहली असून तिची पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टमध्ये तिने रावणाचा उल्लेख श्री रावण असा केला आहे.
ओम राऊतचा आदिपुरूष प्रदर्शनाआधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. चित्रपटातील व्हिएफएक्स, कलाकारांची वेशभूषा ते सिनेमातील संवाद यावर प्रेक्षकांसह समीक्षकांनीही आक्षेप व्यक्त केला आहे. तसंच, काही हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. तर, काहींनी थेट आदिपुरुषविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या चित्रपटाबाबत आता केतकी चितळेनेही मत व्यक्त केले आहे.
केतकी चितळेची पोस्ट
केतकीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात तिने लिहले आहे की, बऱ्याच लोकांनी मला विचारलं की माझे आदिपुरुष या सिनेमाविषयी काय मत आहे. माझे मतः मी चित्रपट बघितलेला नाही त्यामुळं मी त्यावर बोलू शकत नाही. पण ज्या चित्रपटाच्या टीझरमध्ये शिवभक्त रावण रुद्राक्ष तोडणार असेल तर मी तो चित्रपट बघणारही नाही, असं केतकीने म्हटलं आहे.
केतकीने पुढे लिहलं आहे की, रावण एक शिवभक्त ब्राह्मण होते. ज्यांनी सौराष्ट्रातील सोमनाथ मंदिर बांधले होते. सोमनाथ मंदिर अनेक वेळा पडले आहे. बऱ्याच राजांनी आणि एका राणीने ते पुन्हा बांधले आहे. त्यापैकी एक श्री रावणही आहेत. रामायण हा घडलेला इतिहास आहे. फिरंग्यांनी ठरवलेले मिथ्य नाही. पुरावे आहेत रामायणाचे. नवी पिढी मूर्ख नाही की जे त्यांच्या नावावर बिल फाडून सारवासारव करणे चालू शकेल, असं परखड मत केतकीने मांडले आहे.
ट्रोलर्सना उत्तर
केतकीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केली आहे. काहींना केतकीचे मत अगदी बरोबर असल्याचे म्हणत तिच्या पोस्टचे समर्थन केले आहे. तर, काही जणांना तिने श्री रावण असा उल्लेख केल्यामुळं खटकलं आहे. यावर केतकीने कमेंट करत चि व श्री यातील फरक कळत नाही, त्यांनी शाळेत पुन्हा दाखला घ्यावा, असं थेट उत्तर दिलं आहे.