मुंबई : हिंदी चित्रपटविश्वात काही अभिनेत्रींनी एक काळ गाजवला होता. अशा अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे हेलन. पाश्चिमात्य अंदाज, तसा बाज आणि कॅब्रे नृत्याला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवणाऱ्या हेलन यांचा ८०वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण खान कुटुंबीयांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेलन यांच्या जीवनातील हा खास दिवस आणखी खास करण्यासाठी त्यांच्या मैत्रीणी, ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान, आशा पारेख यांनीही यावेळी उपस्थित राहत आपल्या या मैत्रीणीला खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या समारंभागीत काही फोटो सोशल मीडियावरही पोस्ट करण्यात आले. सलमान खानची बहीण अल्विरा हिच्या पतीने म्हणजेच अतुल अग्निहोत्रीनेही सोशल मीडियावर हेलन यांच्या बर्थडे पार्टीतील काही फोटो पोस्ट केले. 


इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये हेलन या अतिशय आनंदात दिसत असून, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली ही मंडळी, म्हणजेच अभिनेता सलमान खान, सोहेल खान, अर्पिता खान शर्मा आणि अल्विरासुद्धा आनंदात दिसत आहेत. 



हेलन यांच्याविषयी सांगायचं झाल्यास बर्मा येथे त्यांचा जन्म झाला होता. आतापर्यंतच्या चित्रपट कारकिर्दीत त्या ७०० चित्रपटांतून झळकल्या आहेत. एक उत्तम डान्स असणाऱ्या हेलन यांना हिंदी चित्रपट जगतात शक्ती सामंतांच्या 'हावडा ब्रीज' या चित्रपटातून पहिली संधी मिळाली. 'मेरा नाम चिन चिन चू' या गाण्यातून त्या झळकल्या होत्या. पुढे, १९८१ मध्ये त्यांनी सलीम खान यांच्याशी विवाहबंधनात अडकत जीवनाच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली. 



प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अदांनी राज्य करणाऱ्या हेलन यांना २००९ मध्ये पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर, महेश भट्ट यांच्या 'लहू के गो रंग' या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला होता. आजही त्यांची 'मेरा नाम चिन चिन चू', 'आ जाने जा', 'पिया तू अब तो आजा', 'मुंगडा' आणि 'ये मेरा दिल प्यार का दीवाना' ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.