Kiran Mane On Pushkar Jog : राज्यात सर्वत्र मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या सर्वेक्षणावरुन अभिनेता पुष्कर जोग याने संताप व्यक्त केला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नावरुन पुष्कर जोग संतापला आणि पुढच्यावेळी असा प्रश्न विचारला तर कानाखाली मारेल, असं वक्तव्य पुष्कर जोग (Actor Pushkar Jog) याने केलं होतं. पुष्कर जोगच्या या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती. अशातच आता पुष्करच्या पोस्टवर नुकतेच ठाकरे गटात गटात सामील झालेल्या किरण माने (Kiran Mane) यांनी कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. किरण माने यांनी पुष्करला ओपन चॅलेंज दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले किरण माने?


आमच्या मनोरंजन क्षेत्रातल्या वर्चस्ववाद्यांना हल्ली उन्माद चढलाय. 'आमचीच सत्ता' हा पोकळ माज आलाय, असं मी परवाच एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोललो. दुसर्‍याच दिवशी पुष्कर जोग नावाच्या सिनेमात वगैरे काम करणार्‍यानं विधान केलं, "जातगणना करायला आलेली बाई नसती तर मी दोन लाथा घातल्या असत्या." अरे भावा, ते सरकारनं दिलेल्या आदेशामुळे तुझ्या घरी आलेले साधे कर्मचारी होते रे ते... त्यांना हौस नाही तुमचे उंबरठे झिजवायचे. तुला लाथाच घालायच्यात ना? लय राग आलाय का तुला जात विचारल्याचा?, असा सवाल किरण माने यांनी पुष्कर जोगला केला आहे. 


मी तुला चॅलेंज देतो, ज्याने हा जातगणनेचा आदेश सोडलाय त्या नेत्याला लाथा घाल. चल... खुल्लं आव्हान आहे माझं. तू जर त्या जातगणनेचा आदेश देणार्‍या सत्ताधारी नेत्याला लाथा नाही घातल्यास तर तू त्या कर्मचार्‍याकडून चार लाथा खायच्या. आहे दम तुझ्या पार्श्वभागात? असं म्हणत किरण माने यांनी पुष्कर जोगवर सडकून टीका केली आहे. अरे या नेत्यांचे पाय चाटणारी जमात तुमची... आडनाव घेऊन डिंग्या मारतोयस? काय इतिहास आहे तुमच्या आडनांवाचा? असला तरी काय खुट्ट्याला बांधायचाय?? आपलं काम इमानेइतबारे करणार्‍या कर्मचार्‍यांवर कसला माज दाखवतो तू?, असं म्हणत किरण माने यांनी संताप व्यक्त केलाय.


कर्मचारी जर आपली नोकरी बाजूला ठेवुन तुझ्यासमोर आले ना, तर एका दणक्यात तुझं वाकडं शेपूट सरळ करतील. नाद करू नको गरीबांचा. बुद्धी जागेवर ठेवून बोलत जा. मराठ्यांच्या आणि ओबीसींच्या लढ्यात तू तुझ्या द्वेषाची पोळी भाजून घेऊ नकोस. बहुजन शांत आहेत म्हणून मस्तीत विधानं करणं लय महागात पडेल... मापात रहा, असं म्हणत किरण माने यांनी पुष्कर जोगला कडक शब्दात इशारा दिला आहे. 


दरम्यान, मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी (BMC) पुष्कर जोग याच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. पुष्कर जोग यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केली आहे. वाद निर्माण झाल्यानंतर जोग याने आपल्या एक्स अकाउंटवरून हा मजकूर हटवला आहे.