`कॅन्सरपेक्षा त्याचा उपचार...`; चार वर्षांपासून सुरु असलेल्या जीवन-मरणाच्या लढाईबद्दल बोलताना ज्येष्ठ अभिनेत्री भावुक
Kirron Kher on Cancer Treatment : किरण खेर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या कॅन्सरशी लढ्याविषयी सांगितलं आहे.
Kirron Kher on Cancer Treatment : बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर या गेल्या 4 वर्षांपासून मल्टीपल मायलोम नावाच्या ब्लड कॅन्सरशी झुंज देत आहेत. आधीच्या तुलनेत आता त्यांच्या आरोग्यात खूप सुधारणा आहे. पण अजूनही त्या कॅन्सरवर मात करू शकलेल्या नाही. अशात त्याविषयी बोलताना किरण खेर या भावूक झाल्या आहेत. त्यांनी सांगितलं की कसं उपचार सुरु असताना त्या रिअॅलिटी टॅलेंट शो ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ च्या शूटसाठी चंडीगढ ते मुंबई असं अप-डाउन करायच्या. याविषयी त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.
किरण खेर यांनी नुकतीच 'न्यूज 18' शोशाला ही मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की 'मी अभिनय करायचं सोडलं होतं. मी फक्त ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ करत होते आणि त्यासाठी उपचारा दरम्यान, गावावरून अर्थात चंडीगढवरून मुंबई हा प्रवास रस्त्यानं करायचे. जेव्हा मला कॅन्सरविषयी कळलं तेव्हा मी सगळ्यापासून स्वत: ला लांब केलं आणि चित्रपटांपासूनही, पण हा शो सोडला नाही.'
पुढे भावूक झालेल्या किरण म्हणाल्या की, प्रत्येकाला कॅन्सरसारख्या आजाराचा सामना करण्यापासून भीती वाटते पण जेव्हा हा आजार होतो तेव्हा त्याचा सामना करण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. याविषयी सविस्तर सांगत किरण म्हणाल्या, 'लोक या गोष्टीला घाबरतात की कधी त्यांना असा आजार व्हायला नको, पण जेव्हा होतो तेव्हा त्यांच्याकडे त्याचा सामना करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. त्याचा उपचार तर आजारापेक्षा जास्त त्रासदायक असतो. पहिले सहा ते आठ महिने हे खूप कठीण असतात. पण तुम्ही ते सगळं देवावर सोडता. मी नेहमीच हा विचार केला, अगदी निवडणूक लढताना सुद्धा मी हेच म्हटलं आहे की ही माझी लढाई आहे. देव माझ्यासाठी लढतो.'
हेही वाचा : 'तू का...', फोन आणि टिव्ही पाहू नको सांगणाऱ्या करीनाला तैमूर देतो उत्तर
किरण खेर यांनी पुढे सांगितलं की 'आम्ही नेहमीच विचार करतो की ही गोष्ट आपल्या नियंत्रणात नाही, पण खरंतर, देव हे सगळं घडवून आणत असतो.' याचवेळी किरण खेर यांनी सांगितलं की त्यांची कॅन्सरशी झुंज अजून संपलेली नाही. आधीपेक्षा त्या आता थोड्या ठीक आहेत पण त्यांचा लढा अजूनही सुरु आहे.