सनी देओलमुळे मुंबईत घर घेऊ शकला अक्षय कुमार, वाचा `तो` किस्सा
बॉलिवूड निर्माता करण जोहरचा सर्वात प्रसिद्ध चॅट शो `कॉफी विथ करण` चा 7वा सीझन सुरु आहे.
मुंबई : बॉलिवूड निर्माता करण जोहरचा सर्वात प्रसिद्ध चॅट शो 'कॉफी विथ करण' चा 7वा सीझन सुरु आहे. त्याच्या पहिल्या एपिसोडमध्ये, आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचे हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी अनेक गुपिते उघड केली. दुसऱ्या एपिसोडमध्ये अभिनेत्री आणि बेस्ट फ्रेंड सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी हजेरी लावली. आता शोचा तिसरा भागही प्रदर्शित झाला आहे. तिसऱ्या एपिसोडमध्ये अक्षय कुमारसोबत सामंथा रुथ प्रभूने हजेरी लावली.
दोघांनीही अनेक गोष्टींचे खुलासे केले. जिथे समंथाने नागा चैतन्यसोबतच्या तिच्या नात्याबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला. तर दुसरीकडे अक्षय कुमारने वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टीही सांगितल्या. अक्षय कुमारने मुंबईतील जुहू येथे त्याचे आलिशान सी फेसिंग घर खरेदी केल्याची कहाणी सांगितली.
जेव्हा करण जोहरने अक्षयला त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांविषयी विचारले, तेव्हा अक्षय म्हणाला, 'मी इंडस्ट्रीत पैसे कमवण्यासाठी आलो होतो. माझे लक्ष अगदी स्पष्ट होते. मी इथे आलो तेव्हा मला ५ हजार रुपये कमवत होतो, पण एके दिवशी मला एक जाहिरात मिळाली आणि त्यात दोन तास काम केल्यावर मला जवळपास २१ हजार रुपये मिळाले. इथे दोन तासांचे पैसे मिळत असताना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देऊन मी काय करतोय, असा विचार मनात आला.’
'जानी दुश्मन: एक अनोखी कहानी' चित्रपटाच्या शूटिंगचे दिवस आठवत अक्षय कुमार म्हणाला की, “मी रोजंदारीवर काम करत होतो. एक सीन होता ज्यात खलनायक मला मारतो आणि मी मरतो. मला कळलं की दुसरा अभिनेता जो आहे तो न्यूयॉर्कमध्ये अडकला आहे आणि तो शूटिंगसाठी येऊ शकणार नाही. त्यामुळे मी चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार कोहली यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याशी बोललो. यानंतर दिग्दर्शकाने जे केले त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. ते म्हणाले, नाही तुझे पात्र मेलेलं नाही तर कोमात आहे आणि मी पुन्हा जिवंत होणार आहे असे म्हणत त्याने लगेचच कथा बदलण्याचा निर्णय घेतला.
अक्षयनं सांगितलं की, ‘यानंतर शूटिंग 5 दिवसांसाठी वाढवण्यात आलं आणि अशा प्रकारे मी अधिक पैसे कमवू शकलो. मी आज ज्या घरात राहतो ते घर विकत घेण्यासाठी मला त्यावेळी खूप पैशांची गरज होती. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. 'जानी दुश्मन: एक अनोखी कहानी' या चित्रपटामुळे मला हे घर खरेदी करता आलं.’
त्यावर लगेच समांथा अक्षयला विचारते, ‘तो अभिनेता कोण आहे ज्याच्यामुळे हे घडलं? अक्षय उत्तर देत सनी देओल असं म्हणाला. सनी देओल काही शस्त्रक्रियेमुळे न्यूयॉर्कमध्ये अडकला होता आणि त्याच्यामुळेच अक्षय कुमार आज मुंबईतील त्या घरात राहू शकतो. अक्षय सनी देओलला स्वत:साठी खूप भाग्यवान मानतो.’
करणच्या या चॅट शोला सुरुवातीपासूनच खूप प्रेम मिळत आहे. पहिल्या एपिसोडवरच प्रेक्षकांनी इतकं प्रेम केलं की सर्वाधिक व्ह्यूज असलेला हा शो टॉप लिस्टमध्ये जोडला गेला. करणच्या शोचा ७वा सीझन ७ जुलैपासून सुरू झाला आहे. हा शो टीव्हीवर नाही तर OTT चॅनल Disney Plus Hotstar वर प्रसारित केला जात आहे.