Korean Singer Park Bo Ram death : दक्षिण कोरियातून एक धक्कादायक बातमी समोर आली. दक्षिण कोरियातील लोकप्रिय गायिका पार्क बो राम हिचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. पार्क बो रामचे गुरुवारी 11 एप्रिलला निधन झाले. एक्सएएनएडीयू एंटरटेनमेंट या एजन्सीने एक निवदेन प्रसिद्ध करत तिच्या निधनाची माहिती दिली आहे. सध्या तिच्या मृत्यूच्या कारणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे, असे यात म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक्सएएनएडीयू एंटरटेनमेंटने निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही तुम्हाला एक दुर्दैवी बातमी देत आहोत. पार्क बो राम हिचं 11 एप्रिल रोजी रात्री उशिरा अचानक निधन झालं आहे. एक्सएएनएडीयू एंटरटेनमेंटचे सर्व कलाकार आणि कर्मचारी तिच्या मृत्यूबद्दल शोकाकुल आहेत. तिच्या कुटुंबाशी चर्चा करून त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सध्या तिच्या मृत्यूच्या कारणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.  


दक्षिण कोरियातील नामयांगजू या पोलिस स्थानकातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "पार्क बो राम ही मृत्यूच्या आदल्या रात्री तिच्या मित्रांसोबत ड्रिंक करत होती. त्यावेळी रात्री 9.55 च्या सुमारास ती बाथरुममध्ये गेली. पण बराच वेळ उलटल्यानंतरही आली नाही. त्यामुळे तिचे मित्र तिला पाहण्यासाठी बाथरुममध्ये गेले. यावेळी पार्क बो राम ही बेसिनच्या इथे बेशुद्ध अवस्थेत सापडली. त्यानंतर तिच्या मित्रांनी तिला रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले." 


पार्क बो रामचा अल्पपरिचय


पार्क बो राम हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबद्दलची माहिती अजून समोर आलेली नाही. सध्या पोलिसांकडून तिच्या मृत्यूची चौकशी सुरु आहे. तसेच तिच्या मृत्यूच्या कारणांचा शोधही सुरु आहे. दरम्यान पार्क बो राम ही दक्षिण कोरियातील लोकप्रिय गायिका होती. तिला या क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. पार्क बो रामला 2010 मध्ये सुपरस्टार K2 या शोमध्ये झळकल्यानंतर प्रसिद्धी मिळाली.


तिने 2014 मध्ये ‘ब्यूटीफूल’ या गाण्याद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ‘सॉरी’, ‘प्रिटी बे’, ‘डायनॅमिक लव्ह’, ‘सेलेप्रिटी’ ही तिची गाजलेली गाणी आहेत. याशिवाय तिने अनेक कोरिअन ड्रामासाठीही गाणी गायली होती. पार्क बो राम ही यावर्षी तिचा स्टुडिओ अल्बमही प्रदर्शित करणार होती. पण त्यापूर्वीच तिचे निधन झालं. तिच्या निधनानंतर जगभरातील चाहते तिला श्रद्धांजली वाहत आहेत.