मुंबई : चित्रपटांव्यतिरिक्त इतर अनेक कारणांनी चर्चेत असलेली अभिनेत्री कोयना मित्राने तिच्या एका मैत्रिणीलाच २२ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी दिवाणी न्यायालयाने कोयनाला मैत्रिणीचे पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. २०१२-१३ मध्ये कोयनाने तिची मैत्रीण पूनम सेठी हिच्याकडून २२ लाख रुपये उधारीवर घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी कोयनाने चार धनादेश तिला दिले होते, मात्र ते वठले नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासूनच्या काळाचा व्याज पकडून मैत्रिणीचे २२ लाख रुपये परत करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. मात्र अनेकदा बजावल्यानंतरही कोर्टात हजर न राहिल्याने या सर्व आरोपांवर कोयनाची बाजू न ऐकून घेताच हा निर्णय देण्यात आला.


पूनम सेठीच्या माहितीनुसार, जुलै २०१२ मध्ये कोयनाने तिच्याकडे १० लाख रुपये उधार मागितले होते. मात्र त्यावेळी सेठीची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने तिने फक्त ५ लाख रुपये कोयनाला दिले होते. त्यानंतर कोयनाने वेळोवेळी तिच्याकडून पैसे घेतले. कधी सहा लाख, तीन लाख, तर कधी नऊ लाख रुपये असे मिळून २२ लाख रुपये पूनमकडून घेतले. पुढे पूनमने जेव्हा कोयनाला पैसे परत मागितले तेव्हा तिने तिला २२ लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र हा धनादेश वठले नाहीत. 
त्यामुळे दोघींमधील वादही वाढले. अखेर पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कोयनाला धडा शिकवण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय पूनमने घेतला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.