क्रिकेटच्या इतिहासात नोंद नसलेला ऐतिहासिक सामना
असा क्रिकेटचा सामना आहे ज्याची नोंद क्रिकेटच्या इतिहासात कुठेही केलेली नाही.
मुंबई : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत ज्यांना प्रदर्शित होऊन अनेक काळ लोटला आहे. परंतु त्यांच्या कथेमुळे ते आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. असाच एक चित्रपट तो म्हणजे 'लगान'... ऑस्कर नॉमिनेटेड चित्रपट 'लगान'ला प्रदर्शित होऊन आज १८ वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी १५ जूनला 'लगान' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि चाहत्यांनी चित्रपटाला चांगलंची दाद दिली. 'लगान'मध्ये दाखवण्यात आलेला गावकरी आणि ब्रिटिशांमधील क्रिकेट सामना आजही अनेकांच्या लक्षात आहे. हा एकमेव असा क्रिकेटचा सामना आहे ज्याची नोंद क्रिकेटच्या इतिहासात कुठेही केलेली नाही.
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'लगान'ला १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्याने आमिर खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आशुतोष गोवारीकर आणि 'लगान'मध्ये काम केलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आवाजात स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांकडून भारतीयांवर होत असलेले अत्याचार आणि भारतीयांचा संघर्ष, ब्रिटिशांच्या दहशतीत गावकरी जगत असलेली परिस्थिती व्यक्त केली आहे. क्रिकटेच्या एका अभुतपूर्व सामन्यावर आधारित असलेल्या चित्रपटाच्या कथेने बाजी मारत प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. अनेक वर्षांनंतर आजही हा क्रिकेटचा सामना, 'भूवन' चाहत्यांच्या मनात कायम आहे. 'या ऐतिहासिक विजयानंतरही या क्रिकेटच्या सामन्याची इतिहासात कुठेही नोंद करण्यात आलेली नसल्याचे' चित्रपटाच्या शेवटी सांगण्यात आलं आहे.
'लगान' चित्रपटाचं ऑस्कर २००२ मध्ये 'बेस्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म' म्हणून निवड झाली होती.