मुंबई : महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी झी मराठीने यावर्षी अठरा वर्षे पूर्ण केली. अठरा वर्ष म्हणजे एका अर्थाने नवतारुण्यात पदार्पण. यामुळेच यावर्षी 'उत्सव नात्यांचा नवतारुण्याचा' अशी संकल्पना घेऊन झी मराठी अवॉर्ड्सचा सोहळा अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडला. ज्यामध्ये १० पुरस्कार पटकावत ‘लागिरं झालं जी’ ने बाजी मारली. त्यापाठोपाठ 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेनेही सात पुरस्कार मिळवत आपला ठसा उमटवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेक्षकांच्या मतांद्वारे निवडण्यात येणा-या या पुरस्कारांसाठी यंदा भरघोस मतदानही झाले. राज्यातील २२ शहरांमधून झालेल्या या मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष मतदान, फेसबुकद्वारे मतदान, वेबसाईटवरुन मतदान आणि मिस्ड् कॉलद्वारे मतदान असे पर्याय ठेवण्यात आले. या सर्व माध्यमांतून प्रेक्षकांनी १२ लाखांच्यावर मतांचा पाऊस पाडत भरभरून प्रतिसाद दिला. 


झी मराठीवरील मालिकांमधील कलाकारांचे रंगतदार नृत्य सादरीकरण, चला हवा येऊ द्या च्या कलाकारांनी उडवून दिलेली धम्माल आणि जोडीला संजय मोने आणि अतुल परचुरेसारख्या अनुभवी कलाकारांनी आपल्या निवेदनातून केलेल्या तुफान फटकेबाजीने हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेला. सळसळता उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलेला हा सोहळा येत्या रविवारी, १५ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वा. झी मराठी आणि झी मराठी एच डी वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.


दिवाळीचा सण जवळ आला की प्रेक्षकांना उत्सुकता असते ती 'झी मराठी अवॉर्डस'च्या रंगतदार आतिषबाजीची. या सोहळ्यात कोणती व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट ठरणार ? लोकप्रिय नायक, नायिकेच्या पुरस्काराची विजयी माळ कुणाच्या गळ्यात पडणार ? लोकप्रिय मालिकेचा मान कुणाला मिळणार? असे उत्सुकतापूर्ण प्रश्न सर्वांच्या मनात असतात. अशीच उत्सुकता यंदाही होती. यावर्षी 'लागिरं झालं जी' आणि 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार असं चित्र सुरुवातीपासूनच निर्माण झालं होतं. याचा प्रत्यय प्रत्यक्ष पुरस्कार सोहळ्यातदेखील आला. 


ज्यामध्ये 'लागिरं झालं जी' या मालिकेने सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत, सर्वोत्कृष्ट सहाय्यक स्त्री आणि पुरुष व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा , सर्वोत्कृष्ट बाल कलाकार, सर्वोत्कृष्ट जोडी,  सर्वोत्कृष्ट आजी, सर्वोत्कृष्ट वडिल, सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट जोडी असे पुरस्कार पटकावित या सोहळ्यावर आपली ठसठशीत मोहोर उमटवली. तर सर्वोत्कृष्ट भावंडं, सर्वोत्कृष्ट सासरे, सर्वोत्कृष्ट आई,  सर्वोत्कृष्ट सून, सर्वोत्कृष्ट कुटुंब आणि सर्वोत्कृष्ट नायक असे पुरस्कार मिळवत सोहळ्यावर आपली छाप सोडली. यंदाचा सर्वोत्कृष्ट मालिकेच्या पुरस्कारांसाठीही या दोन मालिकांमध्ये जोरदार चुरस रंगली. प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हा समसमान होता त्यामुळे या दोन्ही मालिकांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला.


रंगतदार परफॉर्मन्स


यावर्षीच्या सोहळ्याची शान ठरली ते यात सादर झालेले रंगतदार परफॉर्मन्स यातही लक्षवेधी ठरली ती प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्रीने सादर केलेली कव्वाली. ‘युं ही सौ साल तक झी मराठी हम भी देखेंगे’ म्हणत या दोघांनी ही कव्वाली सादर करत एकच धम्माल उडवून दिली. तर अजिंक्य-शितल, राणा-अंजली, समीर-मीरा, नीरज-नुपूर या जोड्यांचा रंगतदार डान्स आणि मल्लिका-जुई, राधिका-शनाया, भानू-शोभा मधील टशन दाखवणा-या डान्स परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमने सादर केलेल्या स्किटने प्रेक्षकांना खळखळून हसवले. कलाकारांसोबतच सूत्रसंचालक संजय मोने आणि अतुल परचुरेंनी विनोदाचं अचूक टायमिंग साधत आपल्या खुमासदार निवेदनाने हा सोहळा अधिकच रंगतदार बनवला.


एकंदरीतच, धम्माल मजा मस्तीने रंगलेला ‘झी मराठी अवॉर्ड्स २०१७’ चा हा शानदार सोहळा बघायला विसरु नका येत्या १५ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वा. झी मराठीसह झी मराठी एचडीवर.