मुंबई : 'लागीरं झालं जी' मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेल्या राहुल्या आणि जयडीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ होत आहे. 'मला लय कॉन्फिडन्स हाय’ हा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या व्यक्तिमत्त्वाने आतापर्यंत सगळ्यांचीच मनं जिंकत आलेला राहुल्या आता रुपेरी पडदा गाजवायला सज्ज झाला आहे. त्याचप्रमाणे जयडीच्या नकारात्मक भूमिकेला देखील प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


धोंडिबा बाळू कारंडे निर्मित-दिग्दर्शित 'पळशीची पीटी' या आगामी मराठी चित्रपटात राहुल एका विकास शिंगाडे नामक हवालदाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ऍथलेट 'भागी'वर आधारलेल्या या चित्रपटात तो या पळशीच्या पीटीवर हवालदिल झालेला दिसणार आहे. ही पळशीची पीटी दुसरी-तिसरी कुणी नसून जयडी म्हणजेच किरण ढाणे आहे.राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये नावाजलेला 'पळशीची पीटी' हा चित्रपट ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करतो.  




तरुणांमध्ये प्रचंड प्रसिद्ध असणारा 'राहुल्या' या प्रेमळ दोस्ताला त्याच्या 'पळशीची पीटी' मधील व्यक्तिरेखेविषयी विचारले असता, तो म्हणाला की 'आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. समोरच्याने आपल्यावर विश्वास दाखवत दिलेली नवनवीन कामं हेच मी माझं यश मानतो. दिग्दर्शक धोंडिबा बाळू कारंडे यांनी मला या चित्रपटासाठी विचारताच माझा आत्मविश्वास तिपटीने वाढलाय.'


ग्रामीण भागातील उदासीन शिक्षणपद्धतीवर भाष्य करणारा 'पळशीची पीटी' हा चित्रपट तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम करतो. २३ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.