सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शक : समीर विद्वंस 
निर्माते : फ्रेश लाईम फिल्म्स, झी स्टुडिओज
भूमिका : ललित प्रभाकर, भाग्यश्री मिलिंद, अंकिता गोस्वामी आणि इतर 


आनंदीबाई गोपाळराव जोशी.... भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. अशी ओळख शालेय जीवनात एका धड्यातून झालीच होती. तेव्हा धड्यातच त्यांचा एक फोटोही अनेकांनी पाहिला होता. त्यांची आणि अनेकांचीच ओळख ही तितकीच. अवघ्या काही शब्दांची, पानांची. पण, ती ओळखही अशी काही होती, की आनंदीबाई जोशी म्हटलं की ऊर अभिमानाने भरुन यायचा, येतो आणि यापुढेही येत राहील. ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने त्याच अभिमानाला एक सोनेरी किनार दिली आहे. समीर विद्वांस दिग्दर्शित हा चित्रपट दोन तास तेरा मिनिटांसाठी थेट शतकापलीकडल्या काळात घेऊन जातो आणि पुन्हा एकदा समाज, ब्रिटीशकालीन भारत, स्त्री शिक्षणास होणारा विरोध, त्यातही गोपाळराव जोशींसारखी माणसं याच कर्मठ समाजाच्या विरोधात जाऊन कशा प्रकारे स्वप्नांचा शेला विणत होते याचा प्रत्यय करुन देतो.


एकोणीसाव्या शतकातील भारत आणि त्याच भारतातील मुंबई, कल्याण, ठाणे, कलकत्ता अशा भागांमध्ये आकारास आलेली एक खरीखुरी आणि असामान्य कथा मांडण्याचं शिवधनुष्य समीर विद्वांस यांनी पेललं. त्यावर ललित प्रभाकर, भाग्यश्री मिलिंद यांच्यासह इतर कलाकारांच्या अभिनयाची प्रत्यंचा चढवली आणि 'आनंदी गोपाळ' हा चित्रपटरुपी बाण सोडला ज्याने चांगलाच नेम साधला आहे. यामध्ये छोटी यमू म्हणजेच आनंदीबाईंच्या बालपणीच्या भूमिकेत दिसणाऱ्या अंकिता गोस्वामी हिनेही सुरेख अभिनय सादर केला आहे. 


आनंदीबाईंचा प्रवास नेमका कसा होता, त्यात किती खाचखळगे होते याविषयी बरंच ऐकलं, बोललं गेलं. चित्रपटाच्या निमित्ताने ते पाहता आलं. सिनेमॅटीक लिबर्टी घेत काही दृश्य कथानकाच्या आवश्यकतेनुसार समोर येतात, त्यातलं एखाद दुसरं दृश्य खटकतंही. पण, आनंदीबाईंच्या प्रवासची व्याप्ती ते झाकोळून जाते. खरंतर हा चित्रपट आनंदीबाईंहून जास्त गोपाळरावांनाच समर्पित आहे. व्हॅलेंटाईन्स डे अर्थात प्रेमाची ही नि:स्वार्थ भावना साजरा करणाऱ्या या वातावरणामध्ये, या दिवसांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या आनंदी गोपाळ हीसुद्धा प्रेमाची एक अव्यक्त भावनाच आहे. एका असामान्य जोडप्याच्या सहप्रवासाची कथा पाहता, जोडीदाराची साथ, त्याचं असणं किती महत्त्वाचं असतं हीच बाब सुरेखपणे अधोरेखित करतं. नात्यात महत्त्वाची असणारी साथीदाराची साथ, विश्वास, एकमेकांकडून मिळणारा धीर आणि त्यातून गवसणारे सुखाचे क्षण नेमके काय असतात, याची झलक चित्रपटातून पाहता येते. त्याला साथ मिळते ती म्हणजे पार्श्वसंगीताची. 


संगीताच्या माध्यमातूनही बऱ्याच गोष्टी व्यक्त होऊ शकतात ही बाब अचूकपणे हेरत 'आनंदी गोपाळ'ला पार्श्वसंगीत देण्यात आलं आहे. काही दृश्यांच्या वेळी कलाकारांचा अभिनय आणि याच पार्श्वसंगीताने नकळत डोळ्यांच्या कडा पाणावतात आणि 'आनंदी गोपाळ'च्या प्रवासाचे साक्षीदार झाल्याचा आनंदाभिमान वाटतो. भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर, त्यांचा प्रवास, समाजाकडून त्यांची, त्यांच्या कुटुंबाची झालेली अवहेलना पाहताना खरंच त्या काळात त्यांना मिळालेली गोपाळरावांची साथ ही शब्दांत मांडणं निव्वळ अशक्य आहे. कारण, आनंदी गोपाळ हे नावही एकाच श्वासात घेतल्या जाणाऱ्या सूरासारखे आहे. ज्यांचा उल्लेख कधी वेगळ्याने होऊच शकत नाही. आनंदीबाईंच्या या प्रवासात त्यांच्यावर असणारं छत्र, त्यांची सावली, त्यांची ढाल आणि प्रेरणास्त्रोत असणाऱ्या गोपाळरावांना पाहता खरंच त्यांच्या ध्यासालाही दाद द्यावी तितकी कमी, असंच वाटतं. कारण, त्यांच्यामुळेच आनंदीबाईंना सातासमुद्रापार जाऊन डॉक्टरकीची पदवी घेता आली आणि भारताला मिळाली पहिली महिला डॉक्टर.... डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी. याच असामान्य आणि आदर्श जोडप्याची कथा पाहण्यासाठी चित्रपटगृहाच्या दारी नक्की जा... 


- चार स्टार 


SAYALI.PATIL@zeemedia.esselgroup.com