मुंबई : 'द काश्मिर फाइल्स' हा चित्रपट सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. 90 च्या दशकात काश्मीरी पंडीतांवर झालेल्या अत्याचारांवर हा सिनेमा बनवण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकांची मोठी गर्दी चित्रपटगृहात पाहायला मिळत आहे आणि हा चित्रपट पाहून प्रेक्षक भावूक होत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची मोठी कमाई होत आहे. हा चित्रपट खूप यशस्वी झाला असला तरी एका गोष्टीचं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना खूप वाईट वाटत आहे.


विवेक अग्निहोत्री म्हणाले की, "चित्रपटाचा आशय इतका दमदार आहे की त्यात कोणत्याही प्रकारचे गाणे ठेवण्यास वाव मिळाला नाही. अशा स्थितीत चित्रपटात लोकगीते घेण्याबाबत आमचं ठरलं होतं. ते गाणं लता मंगेशकरांनी गावं अशी आमची इच्छा होती. आम्हाला माहीत होतं की लताजी आता गात नाहीत. पण तरीही आम्ही त्यांना विनंती केली होती."


पुढे विवेक अग्निहोत्री म्हणाले, "विनंतीवरून त्यांनी गाणं गाण्यास होकार देखील दिला. त्यांचं पल्लवीसोबत एक वेगळच नातं होतं. त्या म्हणाल्या होत्या की,कोरोना संपला की रेकॉर्डिंग सुरु करु.पण नंतर हे सर्व घडलं. मी लता मंगेशकर यांच्यासोबत काम करू शकलो नाही याचा मला नेहमीच खेद राहील."


विवेक अग्निहोत्री यांच्या या मुलाखतीनंतर लता दीदींच्या नावाची चर्चा होत आहे. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनानंतर लता मंगेशकर यांचे नाव चर्चेत आले आहे.