दिग्दर्शक मृणाल सेन काळाच्या पडद्याआड
२००३ मध्ये मृणाल सेन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
नवी दिल्ली: हिंदी चित्रपटसृष्टीतील नव्या वळणाच्या चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माता मृणाल सेन यांचे रविवारी कोलकाता येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. भोवानीपूर येथील निवासस्थानी त्यांना सकाळी साडेदहाच्या सुमारास हदयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्याचवर्षी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांचा मुलगा कुणाल सेन सध्या शिकागोत वास्तव्याला आहे.
मृणाल सेन यांची सुश्रुषा करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या निधनाबद्दलची माहिती दिली. सेन यांना हदयविकाराचा झटका आल्यानंतर आम्ही डॉक्टरांना बोलविले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृणाल सेन यांनी मृत्यूनंतर देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आम्ही सध्या त्यांचा मृतदेह शवागारात ठेवला असून त्यांचा मुलगा येण्याची वाट पाहत असल्याचे सेन यांची सुश्रुषा करणाऱ्या व्यक्तीने सांगितले.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मृणाल सेन यांना पद्मभूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. गेल्या काही वर्षांपासून प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी सार्वजनिक जीवनातून संन्यास घेतला होता. २००३ मध्ये मृणाल सेन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
मृणाल सेन, सत्यजित रे आणि ऋत्विक घातक या दिग्दर्शक त्रयीने दर्जेदार प्रायोगिक बंगाली चित्रपटांची निर्मिती केली. हे चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवरही चांगलेच गाजले. सेन यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका युगाचा अंत झाला असल्याची भावना व्यक्त होत आहे. सध्या बांगलादेशमध्ये असणाऱ्या फरीदपूरमध्ये १४ मे १९२३ रोजी त्यांचा जन्म झाला होता. मृणाल सेन यांनी १९५५ मध्ये 'रात भोर' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नील आकाशेर नीचे' या चित्रपटाने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'बाइशे श्रावण' या चित्रपटामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. मिथुन चक्रवर्ती यांचा पदार्पणाचा चित्रपट असलेल्या 'मृगया' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. मृणाल सेन यांना २० राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.