लॉकडाऊनमुळे अडकलेला अभिनेता तब्बल दोन महिन्यांनी परततोय घरी
तो या ठिकाणी अडकला होता.
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा इशारा म्हणून गेल्या कित्येक दिवसांपासून देशव्यापी ल़ॉक़डाऊन पाळण्यात येत आहे. मुख्य म्हणजे पहिल्या टप्प्यापासून सूरु झालेला टाळेबंदीचा हा काळ आता चौथ्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये अधिक कठोर असणारा लॉकडाऊनचा हा कालावधी चौथ्या टप्प्यात काहीसा सहज असण्याची चिन्हं आहेत. कारण, बहुतांश भागांमध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत.
Coronavirus कोरोनामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन सुरु झाला तेव्हा देशभरात अनेक ठिकाणी असंख्य नागरिक अडकले होते. पर्यटनासाठी किंवा मग आणखी कोणत्या कारणाने देशातील विविध भागांमध्ये गेलेल्या याच नागरिकांमध्ये एका बॉलिवूड अभिनेत्याचाही समावेश होता. जो आता अखेर मुंबईत परतत आहे.
सध्याच्या घडीला आपआपल्या घरी परतणाऱ्यांसाठी आनंदी असणारा हा अभिनेता आहे, अमित सध. आपली घरवापसी होण्याच्या आनंदासोबतस इतरांसाठीही आनंदी असणाऱ्या या अभिनेत्यानं उत्तराखंडसरकारचे विशेष आभार मानले आहेत. तेथील राज्य प्रशासनाकडून राज्याच्या सीमा ओलांडण्यासाठी देण्यात आलेली परवानगी आणि त्यांच्याकडून घेण्यात आलेली काळजी हे अतीशय महत्त्वाचं असल्याची भावना त्यानं व्यक्त केली.
जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ निसर्गाच्या सानिध्यात व्यतीत केल्यानंतर अमित अखेर मुंबईत परतला. त्याने रस्ते वाहतुकीच्या मार्गानं १८०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. १६ मार्च रोजी त्यानं मुक्तेश्वर येथून प्रवासाची सुरुवात केली होती. पण, लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळं त्याची वाट मध्येच अडली.
आव्हानाच्या या काळातविषयी त्यानं तक्रारीचा सूर अजिबातच आळवला नाही. उलटपक्षी परतण्याचा निर्णय घेणं हेच किती कठिण होतं, हे त्यानं स्पष्ट केलं. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, 'वैयक्तिक पातळीवर म्हणावं तर, तो एक कठीण निर्णय होता. कारण त्या पर्वतरांगांमध्ये आम्ही सुरक्षित होतो. तिथे कोरोनाचा संसर्ग नव्हता. पण, त्यानंतर मात्र घरी परतण्याचाच विचार आमच्या मनात डोकावला', असं अमित म्हणाला.
आपलं घर सांभाळणारा प्रकाश हा मदतनीस आणि घरी असणारे पाळीव कुत्रे यांची फार आठवण आल्याची भावनाही त्यानं व्यक्त केली. मित्रांसमवेत परतीचा प्रवास करणाऱ्या अमितच्या मते कोरोना विषाणूच्या या वैश्विक महामारीनं देशाला बरे, वाईट आणि विचित्र असे अनुभव दिले आहेत.
या दोन महिन्यांनी खुप काही शिकवलं....
आतापर्यंतच्या जीवनात मी कधीही अशा प्रकारची मनसिक शांतता अनुभवली नव्हती, जी मी गेल्या दोन महिन्यांत अनुभवली. पैसा कमवणं, अमुक काही गोष्टी मिळवणं, करिअरच्या वाटांवर पुढे जाणं या साऱ्यापेक्षाही आयुष्य जगणं हे कैक पटींनी महत्त्वाचं असल्याची सुरेख शिकवण त्याला मिळाली.
कोरोनाचा हा आव्हानात्मक काळ संपल्यानंतरही संकट टळलं असं कोणीही समजू नये असा संदेशही त्यानं दिला. बेरोजगारी, आर्थिक संकट, तणाव, नैराश्य या साऱ्यातून वाट काढत पुन्हा एकदा जगण्याची नव्याने सुरुवात करायची आहे. त्यामुळं भावनिक आणि मानसकिदृष्ट्या बळकट राहणंच उत्तम, असं म्हणत त्याने आपली मत मांडलं.