मुंबई : मराठी चित्रपटांचा सध्या भरभराटीचा काळ सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवनवीन आशयविषयांचे चित्रपट तयार होत आहेत. मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवरही दमदार कामगिरी करत आहे. या सगळ्या कारणांनी हिंदीतील मातब्बर कलाकार ही मराठी चित्रपटांमध्ये हजेरी लावत आहेत. मराठी चित्रपटांमध्ये दाखल झालेल्या कलाकारांमध्ये आता हिंदीतील एक महत्त्वाचं नाव वाढणार आहे. देवी सातेरी प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या, अभिनेता लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित 'एक सांगायचंय... UNSAID HARMONY'  या चित्रपटातून  सुप्रसिद्ध अभिनेता के.के. मेनन मराठीत प्रमुख भूमिकेतून पदार्पण करत आहे. नुकतंच या चित्रपटाचे टायटल लाँच करण्यात आले.


लोकेश गुप्ते मराठी सिनेमाचं करणार दिग्दर्शन


अभिनेता लोकेश विजय गुप्तेनं मराठी रंगभूमी, टीव्ही मालिका, चित्रपट या सर्व माध्यमांतून स्वतःचा ठसा उमवटलेला आहे. या सर्व माध्यमातून बरीच वर्षं काम केल्यानंतर आता लोकेश चित्रपट दिग्दर्शनाकडे वळला आहे. पहिल्या चित्रपटासाठी त्यानं संवेदनशील विषयाची निवड केली असून या चित्रपटासाठी त्यानं के.के. मेनन सारख्या मातब्बर अभिनेत्याची निवड केली आहे. चित्रपटाची निर्मितीपूर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून ९ मार्चला या  चित्रपटाच्या चित्रीकरण सुरुवात होणार आहे. संजय मेमाणे, पुष्पांक गावडे  सिनेमॅटोग्राफी, अभिनेता जितेंद्र जोशीचे गीतलेखन, शैलेंद्र बर्वेचे बहारदार संगीत, नितीन कुलकर्णी यांचे कला दिग्दर्शन आणि चैत्राली लोकेश गुप्ते यांची वेशभूषा या चित्रपटाला लाभणार आहे.


मराठी चित्रपट मी पाहतो. मराठी चित्रपटाच्या कथा माझ्या मनाला भिडतात. चित्रपटाची कथा मला लोकेशन ऐकवली तेव्हा माझ्या मनाला ती भिडली आणि मी लगेच होकार दिला.महाराष्ट्रात राहत असल्याने मराठी भाषा मी खूप ऐकली आहे. मला मराठी भाषा बोललेली समजते सुद्धा. या चित्रपटासाठी मी मराठीचे धडे गिरवणार असल्याचे अभिनेता के.के.मेनन यांनी सांगितले.


चित्रपटाविषयी लोकेश म्हणाला, 'हा चित्रपट आहे पालक आणि मुलं ह्यांच्या मधल्या न बोलल्या गेलेल्या सुसंवादाबद्दल... बदलत चाललेली जीवनशैली, पालकांचं व्यग्र शेड्युल् , मुलांकडून असलेल्या अपेक्षा, दिवसागणिक बदलत जाणारं जग,जीवघेणी स्पर्धा, मुलांची आणि पालकांची बदलत जाणारी मानसिकता, त्याचे पालक आणि मुलं या दोघांवरही होणारे बरे-वाईट परिणाम  या चित्रपटाव्दारे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.' 'चित्रपटातल्या मुख्य भुमिकेसाठी एक उत्तम संवेदनशील नट, उत्तम व्यक्तिमत्व आणि विषय समजून तो तितक्याच ताकदीने मांडणारा कलाकार मला हवा होता. तो अभिनेता मला के.के. मेननच्या रुपानं मिळाला. माझ्यातल्या दिग्दर्शकालाच नव्हे, तर माझ्यातल्या लेखकालाही पटला. त्याला भेटल्यावर माझा निर्णय योग्य असल्याची खात्री झाली आणि मी त्याच्या नावावर शिक्कामोर्तब केलं,' असंही लोकेशनं सांगितलं.


'एक सांगायचंय... UNSAID HARMONY' हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर १८ ऑक्टोबरला  संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.