मुंबई : डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित, राहुल आवटे, जयंत जठार दिग्दर्शित 'पंचक' चित्रपट आता सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड झळकत आहेत. प्रेक्षकच नाही तर बॉलिवूडच्या कलाकारांकडूनही 'पंचक'चे भरभरून कौतुक होत आहे. सर्व वयोगटातून या चित्रपटाला पसंती मिळत असताना चित्रपटाचे निर्माते डॉ. श्रीराम नेने, माधुरी दीक्षित, दिग्दर्शक, कलाकार प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चित्रपटगृहांना भेट देत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट प्रदर्शित झाल्यांनतर पुणे, ठाणे, दादरमधील काही चित्रपटगृहांना माधुरी दीक्षित यांनी भेट दिली. या वेळच्या प्रतिक्रिया खूप कमाल होत्या. अनेक ठिकाणी 'माधुरी, माधुरी' असा आवाज देत माधुरी दीक्षितचे जंगी स्वागत झाले. काहींनी माधुरी दीक्षित यांना नाव घेण्याची विनंतीही केली. माधुरीनेही त्यांच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली. यावेळी चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांसोबत संवाद साधला. चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहाण्याचा आनंद लुटला, धमाल केली.


 प्रेक्षकांनी सिनेमात प्रचंड आवडलेल्या काही सीन्सवर चर्चाही केली. मग तो पायात कळशी अडकण्याचा सीन असो किंवा दिलीप प्रभावळकर यांना वेगळ्या अवतारात बघून कॅरेक्टर्सची उडालेली भंबेरी असो. ओपेरा तर सिनेमाचा हायलाईट आहे आणि मुंडावळ्याचा सीन हसून हसून पोटात गोळा आणतो आणि जाता जाता एक सुंदर मेसेज देऊन जातो. एका शो दरम्यान आदिनाथ कोठारे भावुक झाला. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा हा चित्रपट अप्रतिम झाला असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. 'पंचक'ला भरभरून प्रेम दिल्याबद्दल माधुरी दीक्षित यांनी यावेळी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले.


गेल्या काही दिवसांपासून 'पंचक' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेता आनंद इंगळे, अभिनेत्री आरती वडगबाळकर, अभिनेत्री दीप्ती देवी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  या सिनेमाला आणि गाण्यांना प्रचंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ हा चित्रपट शुक्रवारी ५ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाद्वारे कोकणातील खोत कुटुंबाची गोष्ट उलगडण्यात आली आहे.