मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार,  येत्या गुरूवारी दिनांक २२ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते श्री. अशोक सराफ यांना मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तर मानाचा "गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार" ज्येष्ठ पार्श्र्वगायक श्री. सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरळी येथील डोम, एनएससीआय ( नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात करण्यात येतील. या समारंभास केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री. पीयूष गोयल, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर, विधानसभा अध्यक्ष ॲड. श्री. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई शहर उपनगर पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.


नुकताच ज्येष्ठ अभिनेते श्री. अशोक सराफ यांना २०२३ साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. राजकपूर जीवनगौरव पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अरुण इराणी, सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेते श्री. मिथुन चक्रवर्ती आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती हेलन यांना जाहीर झाला आहे तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ दिग्दर्शक श्री. जे. पी. दत्ता, सन २०२१ साठी ख्यातनाम गायक श्री. सोनू निगम आणि सन २०२२ साठी श्री. विधू विनोद चोप्रा यांना जाहीर झाला आहे. या समारंभात त्यांना सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जातील.


ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार सन २०२० साठी ख्यातनाम चित्रपट अभिनेते स्व. श्री. रविंद्र महाजनी (मरणोत्तर), सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा चव्हाण आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा नाईक यांना जाहीर झाला आहे. यासोबतच चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी चित्रपट दिग्दर्शक श्री. गजेंद्र अहिरे, सन २०२१ साठी ज्येष्ठ पार्श्वगायक श्री. रवींद्र साठे  आणि सन २०२२ साठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक श्री. नागराज मंजुळे यांना जाहीर झाला आहे. या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.


या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे आणि सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी केले आहे.