मुंबई : इंटरनेट, सोशल मीडिया या साऱ्याची उपलब्धता लक्षात घेत मनोरंजनाच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये बरीच प्रगती झाली. यातूनच काही असे कलाकार आणि त्यांची फौजच तयार झाली, जी गेल्या काही काळापासून अविरचपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तेसुद्धा अगदी सातत्याने. याच फौजफाट्यातील अनेक कलाकारांच्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे 'भाडिपा'. युट्यूब म्हणू नका किंवा मग फेसबुक, प्रत्येक ठिकाणी भाडिपाची चर्चा होतेच. आताही 'भाडिपा' चर्चेत आहे ते म्हणजे त्यांनी साकारलेल्या एका गाण्यामुळे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या कणखर भूमिला मानाचा मुजरा करण्यासाठी म्हणून आलोक राजवाडे, पर्ण पेठे, अभय महाजन, पॉला, सोहम पाठक, सागर देशमुख आणि इतरही काही मंडळींनी एक अभिमानास्पद गीत साकारलं आहे. भाषेचा थाट मराठी, अहिरणी, कोकणी, घाटी अशा बोलांनी या गाण्याची सुरुवात होते. शाहीर अमर शेख यांच्या लेखणीतून साकारण्यात आलेल्या या गाण्यात महाराष्ट्राच्या कडेकपारीपासून इथल्या मातीत असणाऱ्या ममतेच्या ओलाव्यापर्यंतच्या असंख्य गोष्टी शब्दांच्या वाटे गुंफण्यात आल्या आहेत. 



'गा उंचावुनी माना .... जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र' असं म्हणणाऱ्या या कलाकारांची फौज पाहता काही नवे चेहरेही दिसत आहेत. मुळात हे चेहरे भाडिपाच्या प्रेक्षकांसाठी नवे असले तरीही त्यांच्या क्षेत्रात ते बरीच उल्लेखनीय कामगिरी करणारे ठरत आहेत. साहिल वाघचं बीट बॉक्सिंग या गाण्याला एक वेगळाच ठेका देत आहे. तर, जागतिक  स्तरावर आंतरराष्ट्रीय शीळ वादन स्पर्धेत जेतेपद मिळवत महाराष्ट्राचं आणि संपूर्ण भारताचं नाव उज्वल करणारा निखील राणे हा अफलातून कलाकारही या गाण्याच्या निमित्ताने त्याची कला सादर करत आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या भूमिप्रती असणारे कृतज्ञतेचे भाव व्यक्त करणारं हे गाणं सोशल मीडियावर चांगलच गाजत असून अनेकांनी ते शेअरही केलं आहे.