‘कुस्ती दंगल’ मध्ये नागराज मंजुळेचा महत्वाचा सहभाग!
अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ
मुंबई : कुस्ती हा महाराष्ट्रातील अस्सल मातीतला रांगडा खेळ. झी टॉकीज च्या विद्यमाने महाराष्ट्रातील मातीतल्या या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी खास ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल ' चे आयोजन करण्यात आले आहे. या लीगचा थरार २ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालवधीत पुण्याच्या बालेवाडीत रंगणार आहे. ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल ' च्या निमित्ताने महाराष्ट्रातील नावाजलेल्या कुस्तीगिरांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीगिरांशी लढताना बघण्याची पर्वणी झी टॉकीज च्या प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार आहे. या बहुचर्चित ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल ’ बरोबर सुरवातीपासूनच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज नावे जोडली जात आहेत .त्यातीलचं एक महत्वाचे नाव म्हणजे दिग्दर्शक नागराज मंजुळे.
नागराज मंजुळे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून ते केवळ दिग्दर्शक नसून लेखक, कवी आणि अभिनेतेही आहेत.आपल्या प्रत्येक कलाकृतीतून संवेदनशीलतेची जाणीव करून देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे महाराष्ट्रातल्या खेळाबाबत ही तितकेच सजग आहेत. पिस्तुल्या, फँड्री व सैराट यासारख्या चित्रपटातून आपले सामाजिक भान दाखवून देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता झी टॉकीजसाठी ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल ’ चा प्रोमो दिग्दर्शित करणार आहेत आणि मुख्य म्हणजे यात ते अभिनय सुद्धा करणार आहेत. स्वतः स्वतःला दिग्दर्शित करणे आणि एक दिग्दर्शक आणि अभिनेता या नात्याने उत्कृष्ट काम करणे हे प्रत्येकाला शक्य नसते. मात्र सैराट च्या अफाट यशानंतर प्रेक्षकांच्या नागराज मंजुळे यांच्या कामाबद्दलच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत आणि नागराज यांचे नवीन काम पाहण्याची सर्वानांच इच्छा आहे. प्रेक्षकांची ही इच्छा ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल ’ मुळे पूर्ण होणार आहे.
उत्कंठा हा कुस्ती या खेळाचा श्वास आहे. पैलवानांनी शड्डू ठोकल्यापासून चितपट करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाढणारी ही उत्कंठा ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल ’ मुळे आता साऱ्या महाराष्ट्राला लागून राहिली आहे . नागराज मंजुळे ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल ’ चा हा थरार प्रोमोच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवणार आहेत. या प्रोमोबद्दल नागराज मंजुळे यांनी सांगितले की, " घरात बसून छोट्या पडल्यावर क्षणक्षणाला उत्कंठा वाढवणारा कुस्ती हा खेळ पाहण्याची मजा काही औरच असेल.‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल ’ शी संलग्न होऊन त्याचा प्रोमो दिग्दर्शित करताना मला खरंच खूप आनंद होत आहे. माझ्या कामावर आजवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केले आहे आणि त्यांना हा प्रोमो सुद्धा आवडेल अशी आशा व्यक्त करतो "
झी टॉकीज व झी युवाचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितलं. ’नागराज मंजुळे यांनी स्वतःला एक उत्तम दिग्दर्शक म्हणून सिद्ध केलं आहे. कुठल्याही एका पठडीत न अडकता, वेगवेगळ्या पद्धतीचे दिग्दर्शन करणे ही त्यांची खासियत आहे. झी महाराष्ट्र कुस्ती दंगल चे प्रोमो दिग्दर्शित करणे हा त्यातलाच एक भाग आहे. नागराज यांनी झी महाराष्ट्र कुस्ती दंगल साठी योगदान देणे ही झी टॉकीज आणि प्रेक्षकांसाठी भाग्याची गोष्ट आहे.’