मुंबई : राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) दिग्दर्शित 'थ्री इडियट्स' (3 Idiots) चित्रपट अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  'थ्री इडियट्स' २५ डिसेंबर २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. गेल्या महिन्यात चित्रपटाने १० वर्ष पूर्ण केली. आता या चित्रपटाचं एक पोस्टर महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी शेअर केलंय. पोस्टरमध्ये आमिर खान, शर्मन जोशी आणि आर. माधवन हे तिघे स्कूटीवरुन बिना हेल्मेट जाताना दिसतात. पोलिसांनी या तिघांच्या फोटोसह 'जाने तुझे देंगे नही' असं लिहित, अनोख्या पद्धतीने सर्वांनाच रोड सेफ्टीबाबत सतर्क केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी पोस्टर शेअर करत, काही ओळी लिहिल्या आहेत. फोटोसोबत 'दिल जो तेरा बात बात घबराये, ड्रायव्हर इडियट है, प्यार से उसको समझा ले' असं कॅप्शन दिलंय. या पोस्टरमधून, पोलिसांनी बिना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांना इशाराच दिला आहे. 


महाराष्ट्र पोलिसांनी अशा प्रकारे ट्रिपल सीट, बिना हेल्मेट गाडी चालवणं, हे योग्य नसल्याचं, #AalIzzNotWell असं म्हणत एका वेगळ्याच अंदाजात सर्वांना वाहतूक नियमांचं पालन करण्याचं सांगितलं आहे. पोस्टरमध्ये आर. माधवन स्कूटी चालवताना दिसतोय. महाराष्ट्र पोलिसांनी या ट्विटमध्ये आर. माधवनलाही टॅग केलंय. 



महाराष्ट्र पोलिसांच्या या ट्विटला माधवनने उत्तर दिलंय. माधवनने ट्विटला उत्तर देताना एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये तो हेल्मेट घालून, गाडी चालवताना दिसतोय.



हा फोटो शेअर करत माधवनने, मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत असल्याचं सांगितलंय. माधवनच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही युजर्सनी माधवनला पूर्ण हेल्मेट घालण्याचा सल्ला दिलाय. तर काहींनी त्याच्या उत्तराचं कौतुकही केलंय.