Sharad Pawar on Maharashtra Shahir Movie : 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट 28 एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहीर साबळे (Shaheer Sable) यांचं आयुष्य दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटातून त्यांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आल्या आहेत. हा चित्रपट पाहणारा प्रत्येक व्यक्ती चित्रपटाचे कौतूक करत आहेत. इतकंच काय तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ज्या प्रकारे हा चित्रपट बनवला त्याची स्तुती तर अनेकांनी केली आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचेही नाव जोडले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांनी काल म्हणजेच 30 एप्रिल रोजी त्यांच्या पत्नी प्रतिभाताई यांच्यासोबत हा चित्रपट पाहिला. त्यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्यांनी हा चित्रपट पाहतांना त्यांना काय वाटले याविषयी सांगितले आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाचं शरद पवारांनी फक्त कौतुक केलं नाही तर संपूर्ण टीमला चित्रपटासाठी खूप शुभेच्छाही दिल्या आहेत. 



शरद पवार यांनी देखील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. हे फोटो शेअर करत ते म्हणाले, 'प्रख्यात शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. शाहीरांच्या गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहीला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संगीताच्या माध्यमातून घराघरात पोहचविण्याचे महान कार्य शाहीर साबळे यांनी केले. चित्रपट पाहताना त्या कालखंडाची पुन्हा आठवण झाली, याचे अत्यंत समाधान वाटले.'


या चित्रपटातून केदार शिंदे यांच्या मुलीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या चित्रपटातील अभिनयानं सना शिंदेनं सगळ्यांना भूरळ पाडली आहे. भानुमती साबळे ही भूमिका सनानं या चित्रपटात साकारली आहे. चित्रपटात आपल्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, साने गुरूजी आणि लता मंगेशकर यांची झलकही पाहायला मिळणार आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी केले आहे. चित्रपटाचे संगीतकार अजय-अतुल आहेत. तर चित्रपटाची पटकथा आणि संवाद हे लेखिका प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.