Juna Furniture Trailer Release​ : मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकरांना ओळखले जाते. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही महेश मांजरेकरांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता महेश मांजरेकर एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'जुनं फर्निचर' असे या चित्रपटाचे नाव आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात महेश मांजरेकरांच्या करारी व्यक्तिरेखेची झलक पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात त्यांची ओळख करुन देण्यापासून होते. माझं नाव गोविंद श्रीधर पाठक असे सांगतच त्यांनी वयाची 71 ओलांडल्याचे सांगत आहे. यानंतर ते त्यांचा दिनक्रम सांगताना दिसत आहे. त्यानंतर यात मेधा मांजरेकरांची एंट्री होते. त्या महेश मांजरेकरांच्या पत्नीची भूमिका साकारत आहेत. यानंतर भूषण प्रधान हा महेश मांजरेकरांचा मुलगा अभय हे पात्र साकारत आहे. तर अभिनेत्री अनुषा दांडेकर ही यात मांजरेकरांच्या सूनेची भूमिका साकारताना दिसत आहे. 


यानंतर महेश मांजरेकर हे त्यांच्या मुलाशी बोलत असतात. पण तो मात्र त्यांच्याशी बोलण्यास टाळाटाळ करतो. अचानक एकदा मेधा मांजरेकरांची तब्ब्येत बिघडते आणि ते त्यांना रुग्णालयात दाखल करतात. पण त्यावेळीही अभय फोनवर उत्तर देणे टाळतो. त्यानंतर मग महेश मांजरेकर हे स्वत:च्या लेकाबद्दल पोलीसात तक्रार करतात आणि मग न्यायलयीन लढाई सुरु होते. यात ते अभयकडून 4 कोटी 72 लाख 86 हजार 100 हे माझ्या हक्काचे पैसे आहेत, असे सांगताना दिसतात. आता यात पुढे काय होतं, ते कशाबद्दलचे पैसे मागतात, त्यांची नेमकी कोणती गैरसोय झालेली असते, हे सर्व चित्रपटातूनच उलगडणार आहे. 



सत्य - सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत 'जुनं फर्निचर' या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर आणि सचिन खेडेकर यांची झलक समोर आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात महेश मांजेरकरांनी गायलेले 'काय चुकले सांग ना ?' हे गाणेही पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा आहे.


या चित्रपटात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर,  समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले आहे. तर यतिन जाधव हे 'जुनं फर्निचर'चे निर्माते आहेत. येत्या २६ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.