मुंबई : भारतात गेल्या काही दिवसांपासून स्टँड अप कॉमेडी जोर धरू लागली आहे. या स्टँड अप कॉमेडीचा एक वेगळा वर्ग देखील आता भारतात निर्माण झाला आहे. यामध्ये अनेक मोठ मोठी नावे समोर आली. पण त्याचबरोबर आणखी एक चेहरा आपलं वेगळं स्थान या स्टँड अप कॉमेडियन्समध्ये तयार करत आहे. आणि ते नाव म्हणजे मराठमोळी दीपिका म्हात्रे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण दीपिका म्हात्रे या घरकाम करणाऱ्या बाई आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्यातील स्टँड अप कॉमेडीयनने समाजात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दीपिका म्हात्रे सकाळी ट्रेनमध्ये ज्वेलरी विकते, दुपारी घरकाम करते. आणि आता जेव्हापासून तिच्या कलेला वाव मिळाला आहे तेव्हा ती स्टँड अप कॉमेडीचे शो देखील करते. महत्वाचं म्हणजे दीपिकाच्या स्टँड अप कॉमेडीमध्ये ती तिचच जीवन मांडत असते. तिचे जोक्स हे तिच्या आजूबाजूच्या घटनांवर असतात. मग ते कधी तिच्या मालकिणीवरचे असतात तर कधी ट्रेनमधील बायकांचे. अनेक वर्षे घरकाम करणारी, कपडे - भांडी धुणाऱ्या दीपिका म्हात्रेला आता स्वतःची अशी स्टँड अप कॉमेडियन म्हणून ओळख मिळाली आहे. ती आपल्या कॉमेडीतून घरकाम करणाऱ्या समुहाबाबत होणार भेदभाव देखील अगदी सहज मांडते. 



दीपिकाला आपल्यातील या गुणाची अशी झाली ओळख?


दीपिकाला आपल्या या गुणाची ओळख तेव्हा झाली जेव्हा तिच्या घरमालकिणीने एकदा घरकाम करणाऱ्या बायकांचा एक टॅलेंट शो ठेवला. या मध्ये काहींनी डान्स केले तर काहींनी गाणं गायलं. मात्र दीपिका म्हात्रेने सगळ्यांना जोक्स ऐकवलं. तिथे उपस्थित असल्यांना ते खूप आवडलं. त्यांनतर दीपिका ज्या घरात घरकाम करायची तिने कॉमेडिअन अदिती मित्तलशी तिची ओळख करून दिली. मग अदितीने तिची खूप मदत केली. 


दीपिकाचे जोक्स हे सोसायटीतील घरकाम करणाऱ्या महिलांवरच अधिक असतात. लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे तसेच त्यांना समाजाकडून कशी वागणूक मिळते. यावर अधिक कॉमेडी असते. अनेकदा दीपिकाला लोकं भेटून तिचं कौतुक देखील करतात.