पुरुषांना प्राधान्य देण्याचा `या` अभिनेत्रीला मनस्ताप
सर्वकाही सुरळीत सुरु होतं. पण....
मुंबई: चौकटीबाहेरचे चित्रपट आणि कथानक या साऱ्याच्या बळावर या कलाविश्वात आपली वेगळी छाप पाडणाऱ्या एका अभिनेत्रीच्या वक्तव्याकडे सर्वांचच लक्ष वेधलं आहे. आयुष्यात या वळणावर आपल्याकडून एक सर्वात मोठी चूक झाल्याचं त्या अभिनेत्रीने उघड केलं आहे.
आपली चूक नेमकी काय होती, हे सांगणाऱ्या त्या अभिनेत्रीचं नाव आहे नीना गुप्ता.
आयुष्याच्या एका वळणावर पुरुषांना जास्त महत्त्वं दिल्यामुळे कुठेतरी करिअरकडे आपलं दुर्लक्ष झाल्याची खंत व्यक्त करत त्यांनी हीच आपली चूक ठरल्याचंही स्पष्ट केलं.
'मी नेहमीच चांगलं काम करण्याला, चांगल्या भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलं. पण, आजच्या घडीला मागे वळून पाहताना पुरुषांना प्राधान्य देणं ही माझी घोडचूक ठरली. एका चांगल्या जोडीदाराच्या शोधात असणाऱी मी करिअरकडे मात्र दुर्लक्ष करत होते', असं त्या पीटीआयशी संवाद साधताना म्हणाल्या.
पुरुष हे कधीच एखाद्या महिलेसाठी अतीव महत्त्वाचे नसावेत ही बाब त्यांनी या ठिकाणी अधोरेखित केली.
एका वळणावर जीवनात सर्वकाही सुरळीत सुरु होतं. लिखाण, दिग्दर्शन, निर्मिती हे सारंकाही सुरेखपणे सुरु होतं. पण, आपल्या खासगी आयुष्यातील घडामोडींचे थेट परिणाम आपल्या कामावर झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
एक महिला म्हणून कुटुंब, जोडीदार या सर्व गोष्टींनाच प्राधान्य दिलं जातं. पण, आपण हे बदलू शकलो असतो, त्याची गरज होती अशा आशयाचं वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं.
#MeToo विषयीसुद्धा त्यांनी यावेळी आपलं मत मांडलं. मुळात या चळवळीमुळे परिस्थिती बदलण्यास मदत होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या या चळवळीमुळे सारं कलाविश्व हादरुन गेलं आहे. पण, सध्याच्या घडीला इतक्या वर्षांपूर्वी घडलेल्या घटना सिद्ध करणार कशा हासुद्धा तितकाच महत्त्वाचा प्रश्न असल्याचं त्या म्हणाल्या.
लैंगिक शोषणाच्या विरोधात सुरु झालेल्या या मोहिमेमुळे एक प्रकारची भीती नक्कीच निर्माण होईल, हा मुद्दा त्यांनी यावेळी अधोरेखित केला. गुप्ता यांचं हे वक्तव्य पाहता ते एक वेगळा दृष्टीकोन देणारं ठरलं आहे हे मात्र खरं.