हॉटेलच्या रुममध्ये आढळला प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह, दरवाजा उघडला असता आत...; पोलिसांकडून तपास सुरु
दिलीप शंकर (Dileep Shankar) अम्मा इरियाते, पंचाग्नी आणि सुंदरी यांसारख्या मल्याळम टेलिव्हिजन शोसह जोडले गेल होते.
मल्याळम अभिनेता दिलीप शंकर यांचा अचानक मृत्यू झाल्याने मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रविवारी तिरुअनंतपुरममधील हॉटेलच्या रुममध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार दिलीप यांनी 19 डिसेंबर रोजी हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं
हॉटेलमध्ये असताना दिलीप शंकर एकदाही रुम सोडून बाहेर गेले नाहीत. त्यांच्या सह-कलाकारांनी त्यांना फोन केले होते. पण त्यांनी एकाही फोनचं उत्तर दिलं नव्हतं. यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं कोणालाही शक्य होत नव्हतं. त्यामुळेच अखेर ते राहत असलेल्या हॉटेलमध्ये ते पोहोचले. यावेळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना रुम उघडण्यास सांगण्यात आलं. दरवाजा उघडून पाहिलं असता आतमध्ये दिलीप बेशुद्ध अवस्थेत होते. तपासलं असता त्यांचा मृत्यू झाला होता.
रिपोर्टनुसार, दिलीप टीव्ही मालिका पंचाग्नीच्या शूटसाठी तिरुअनंतपूरममध्ये होते. मातृभूमीने दिलेल्या वृत्तानुसार, मालिकेच्या दिग्दर्शकाने पोलिसांना दिलीप खूप आजारी होते अशी माहिती दिली आहे. पण हा आजार नेमका कशा प्रकारचा होता हे समोर आलेलं नाही. पण दिलीप या आजारावर उपचार घेत होते.
पोलिसांनी दिलीप यांच्या मृत्यूप्रकरणी तपास सुरु केला आहे. तसंच फॉरेन्सिक टीमला रुमची तपासणी करण्यास सांगण्यात आलं आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, अभिनेत्याच्या मृत्यूमागे कोणतेही अनैसर्गिक घटक नाहीत. “या टप्प्यावर कोणताही अनुचित प्रकार झाल्याची काही चिन्हं दिसत नाहीत. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं नेमके कारण स्पष्ट केलं जाईल," असं पोलीस सूत्राने न्यू इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं आहे.
मूळचे एर्नाकुलमचे असणारे दिलीप शंकर अनेक लोकप्रिय मल्याळम शोचा भाग आहेत. अम्मा इरियाते, पंचाग्नी आणि सुंदरी यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.