Shocking News! पोटाची खळगी भरण्यासाठी शौचालयं स्वच्छ करणार अभिनेता
त्याला या कलाजगतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घ्यावा लागला.
मुंबई : हे चित्रपट जगत अतिशय अशाश्वत आहे. कारण इथं कधी, कुठं आणि कसं कोण प्रसिद्धीझोतात येईल याचा काही नेमच नसतो. जिथं या आगळ्यावेगळ्या दुनियेत काहीजण रातोरात सुपरस्टार होतात तिथंच काहीजण मात्र प्रसिद्धीच्या शोधात वाट भरकटताना दिसतात.
सध्या असंच एक नाव चर्चेत आलं आहे. जिथं अतिशय लोकप्रिय अभिनेत्याच्या आयुष्यात अशी वेळ आली की, त्याला या कलाजगतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घ्यावा लागला.
प्रसिद्धी हतबलतेमध्ये बदलली आणि या अभिनेत्याला केर उचलण्याचं काम करावं लागलं. खुद्द या अभिनेत्यानं जीवनातील या आव्हानात्मक काळाची माहिती दिली.
सेल्फीनं पोट भरत नाही...
मल्याळम चित्रपटसृष्टीत एकेकाळी आघाडीवर असणाऱ्या उन्नी राजन देव (Unni Rajan Dev) यानं आपल्यावर ओढावलेल्या या प्रसंगाला वाचा फोडली. उन्नी राजन देव हा एका कलाकार कुटुंबातील मुलगा होता.
वडिलांच्या निधनानंतर त्यानं लहान भूमिकांपासून सुरुवात केली आणि फार कमी वेळातच तो प्रसिद्धीझोतात आला. त्याला अग्रणी अभिनेत्यांमध्येही गणलं गेलं. कलाजगतानं प्रसिद्धी दिली, पण सेल्फीनं पोट भरत नाही हे दाहक वास्तव त्यानं समोर आणलं. सोबतच त्यानं आपण सफाई कर्मचारी म्हणून काम पत्करत असल्याचंही सांगितलं.
शौचालयं स्वच्छ करण्याची जबाबदारी....
उन्नी कासरगोड येथील एका विद्यार्थी वसतीगृहात त्याला स्वच्छता कर्मचाऱ्याचं काम मिळालं आहे. इथं तो 15 मे पासून नोकरीवर रुजू होणार आहे. केरळ सरकारच्या अनुसूचित जात विकास विभागाच्या पदव्युत्तर विद्यार्थी वसतीगृहाची 10 शौचालयं स्वच्छ करण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल.
आपण स्वेच्छेनं ही इंडस्ट्री सोडल्याचं त्यानं सांगितलं. इथं कामासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागल्याचं सांगत सरकारी नोकरी असल्यास किमान दर महिन्याला घरात पगार तरी येईल, असा विचार त्यानं मांडला.
मागील वर्षी उन्नी त्याच्या खासगी आयुष्यामुळं बराच चर्चेत आला होता. त्याची पत्नी प्रियांका हिनं गळफास लावत आत्महत्या केली होती. तिच्या कुटुंबानं त्याच्यावर कौटुंबीक हिंसेचे आरोपही केले होते. ज्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.