मुंबई : अभिनेता आर. माधवन हा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. आपल्या आगामी चित्रपटाविषयी माहिती देण्यापासून ते मुलाने एखाद्या स्पर्धेत यश मिळवण्यापर्यंत अनेक लहानमोठ्या गोष्टी तो चाहत्यांशी शेअर करत असतो. हाच माधवन नेटकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत त्यांच्याशी संपर्कातही असतो. कलाविश्वात 'मॅडी' म्हणून प्रसिद्ध असणारा हा अभिनेता सध्या गाजतोय तो म्हणजे सोशल मीडिया हाताळण्याच्या त्याच्या अनोख्या अंदाजामुळे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच @shiitiiz नावाच्या एका ट्विटर युजरने त्याच्या अकाऊंटवरुन एक प्रसंग सर्वांसमोर आणला. हा प्रसंग मांडत असताना त्याने आर. माधवनवर एक आरोपही केला. 'बाहेरून खाद्यपदार्थ मागवलं असता ते पोहोचवण्यासाठी आलेला मुलगा हा एक अभियांत्रीकी शिक्षणाचा पदवीधारक अर्थात इंजिनीअर होता. माझ्या सदिच्छा त्याच्यासोबत आहेत. मी आशा करतो की त्याची प्रगती होईल', असं त्याने ट्विटमध्ये लिहिलं. 


पुढे याच युजरने ट्विटमध्ये मॅडीला टॅग करत, 'तुझ्यामुळेच अनेकांनी इंजिनीअरिंगचं शिक्षण घ्यायचं ठरवलं. तुला या गोष्टी उमगतच असतीलच.... कारण ही विनोदी बाब नाही' असंही उपरोधिकपणे लिहिलं. त्याने या ट्विटमध्ये #RHTDM असा हॅशटॅग वापरत या अभिनेत्यावर जणू आरोपच केला. 



'रहना है तेरे दिल मे' या चित्रपटाचा संदर्भ देत ही पोस्ट करण्यात आली होती. ज्यामध्ये आर. माधवनने या चित्रपटात 'माधव शास्त्री' (मॅडी) या इंजिनीअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या एका मुलाची भूमिका साकारली होती. नेटकऱ्याच्या या ट्विटवर नजर जाताच या अभिनेत्याने त्याच्याच शैलीत ट्विटला उत्तर दिलं. 



''यात माझा दोष नाही.... (इंजिनीअरिंगमध्ये) गेलो तर मीपण होतो '३ इडियट्स'मध्ये आणि खऱ्या आयुष्यातही..... सिकंदर होऊन दाखवा.... जिंकून दाखवा... '', असं ट्विट त्याने केलं. त्याच्या या ट्विटचा अंदाज पाहता 'बाबा रणछोडदास' अर्थात '३ इडियट्स'च्या 'रॅन्छो'चा कानमंत्र मॅडी खऱ्या आयुष्यातही अवलंबात आणतो असं म्हणायला हरकत नाही.