मुंबई : सोशल मीडियाची उपलब्धता, त्यामाध्यमातून येणाऱ्या चाहत्यांच्या, निंदकांच्या प्रतिक्रिया आणि या साऱ्याचा कलाकारांच्या आयुष्यावर होणारा परिणाम नेमका कसा असतो, याची झलक 'पिंच' या कार्यक्रमात पाहायला मिळते. अभिनेता, निर्माता- दिग्दर्शक अशा भूमिका पार पाडणारा अरबाज खान या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असून, इथे तो विविध बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत मनमोकळ्या गप्पा मारतो आणि त्यांना काही प्रश्नांची उत्तरं देत बोलतं करतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरबाजच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्याच्या कार्यक्रमाच्या नव्या भागात उपस्थिती पाहायला मिळाली ती म्हणजे खान कुटुंबीयांशी अतिशय चांगले संबंध असणाऱ्या अभिनेत्री कतरिना कैफ हिची. कतरिनाने या कार्यक्रमात सोशल मीडियावर तिच्याविषयी येणाऱ्या प्रतिक्रिया आणि इतरही मुद्द्यावर तिचे विचार मांडले. यामध्येच कार्यक्रम एका रंजक वळणावर आल्यानंतर अरबाजने कतरिनासमोर तिच्या लग्नाचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी आयुष्यात कोणत्याच गोष्टीची शास्वती नाही असं सांगत एक व्यक्ती म्हणून आपला विवाहसंस्थेवर विश्वास असल्याची प्रतिक्रिया तिने व्यक्त केली. 


अरबाजने या सर्व प्रश्नांदरम्यान तिच्यापुढे एका चाहत्याने दिलेल्या लग्नाचा प्रस्तावही ठेवला. सोशल मीडियाच्याच माध्यमातून त्या चाहत्याने कतरिनाला लग्नाची मागणी घातली होती. 'मला तुझा दूरध्वनी क्रमांक दे आणि माझ्याशी लग्न कर बेवफा कतरिना. मीच तुझं खरं प्रेम आहे.... मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही', असं त्या चाहत्याने म्हटलं होतं. त्याच्या या प्रस्तावाला उत्तर देत कतरिनाने परिस्थिती अगदी सुरेखपणे हाताळल्याचं पाहायला मिळालं. 


'आजच्या काळात कोणा एका व्यक्तीच्या इतक्या उत्कट भावना असतील हे पाहून खरंच आनंद होतो. हल्ली प्रत्येकजण हा सर्वच गोष्टींमध्ये समतोल राखण्याच्या प्रयत्नांत असून, कोणत्याच गोष्टींता गांभीर्याने विचार करत नाही.....', असं कतरिना म्हणाली. थोडक्यात तिने हा प्रस्ताव नाकारला. पण, त्या चाहत्याच्या भावनांप्रती तिने आनंदही व्यक्त केला. 



अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबतच्या नात्यात दुरावा आल्यानंतर कतरिनाचं नाव फार क्वचितच कोणा एका अभिनेत्याशी जोडलं गेलं. रणबीरपूर्वी ती 'दबंग खान' सलमान याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्याही चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, कतरिनाच्या खासगी आयुष्याविषयीच्या काही गोष्टी या तिने माध्यमांपासूनही दूर ठेवण्यास प्राधान्य दिलं असून, सध्याच्या घडीला ती आगामी चित्रपट आणि तिच्या कामावरच जास्त लक्ष केंद्रीत करत आहे.