धुळीला मिळवून टाकेन, करणी सेनेच्या धमक्यांना `मणिकर्णिके`चं सडेतोड प्रत्यूत्तर
करणी सेनेला सडेतोड प्रत्यूत्तर देतानाच आपण असल्या धमक्यांना घाबरणार नाही आणि येईल त्या वादाला सामोरं जाण्यासाठी तयार असल्याचं कंगनानं दाखवून दिलंय
मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आपला प्रत्येक विचार स्पष्टपणे आणि ठामपणे व्यक्त करण्यासाठी ओळखली जाते. लवकरच तिचा 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. परंतु, या सिनेमावर करणी सेनेनं आक्षेप घेतलाय. करणी सेना ही संघटना याआधी पद्मावत सिनेमाचा विरोध करून आणि संजय लीला भन्साळी यांच्यावर हल्ला करून चर्चेत आली होती. पण हिंसक पद्धतीनं आपला विरोध व्यक्त करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या संघटनेला पहिल्यांदाच चित्रपट सृष्टीकडून जोरदार प्रत्यूत्तर मिळालंय. आपल्याला करणी सेनेनं असंच छळलं तर त्यांना धुळीला मिळवून टाकू, असं प्रत्यूत्तर 'मणिकर्णिका' बनलेल्या कंगनानं दिलंय.
करणी सेनेला सडेतोड प्रत्यूत्तर देतानाच आपण असल्या धमक्यांना घाबरणार नाही आणि येईल त्या वादाला सामोरं जाण्यासाठी तयार असल्याचं कंगनानं दाखवून दिलंय.
'मणिकार्णिका: द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा आता प्रदर्शनासाठी सज्ज आहे. महारानी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी दिलेल्या स्वत:च्या आहुती आणि बलिदानाची कथा आहे. कंगनानं केवळ या सिनेमात अभिनय केलेला नाही तर या सिनेमाचं दिग्दर्शनही तिनंच केलंय.
करणी सेनेनं घेतलेल्या आक्षेपावर तिनं प्रत्यूत्तर देताना म्हटलंय की, 'चार इतिहासकारांनी हा सिनेमा पाहिलाय. सेन्सॉर बोर्डानं सिनेमाला सर्टिफिकेट दिलंय. अशावेळी करणी सेना मला वारंवार टार्गेट करतेय. जर ते आत्ताच थांबले नाहीत तर त्यांना माहीत असावं की मीदेखील एक राजपूत आहे आणि मी त्यांना धुळीला मिळवून टाकेन'.
उल्लेखनीय म्हणजे, सीबीएफसी अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी हेदेखील मणिकर्णिका सिनेमाशी निगडीत आहेत. त्यांनीच या सिनेमाचे संवाद आणि गाणी लिहिली आहेत.
काही दिवसांपूर्वी खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात हा सिनेमा पाहिला आणि आपल्याला हा सिनेमा आवडला असल्याचंही त्यांनी म्हटलं.
१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या लढाईवर आधारित या सिनेमात अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, वैभव तत्ववादी, सुरेश ओबेरॉय यांसारखे अनेक कलाकार दिसणार आहेत. 'झी स्टुडिओज असोसिएशन'मध्ये तयार झालेला हा सिनेमा येत्या २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
का होतोय मणिकर्णिकेला विरोध
करणी सेनेनं सिनेनिर्मात्यांकडे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आपल्याला दाखवण्याची मागणी केलीय. असं केलं गेलं नाही तर सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही आणि सिनेमाघरांत तोडफोड करण्याचीही धमकी करणी सेनेनं दिलीय. या सिनेमात रानी लक्ष्मीबाई यांचं एका ब्रिटिश सैनिकासोबत कथित संबंध असल्याचं या सिनेमात दाखवण्यात आलंय. तसंच राणी लक्ष्मीबाई यांनाही एका गाण्यात नाचताना दाखवण्यात आलंय, असे आरोप करणी सेनेनं चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच केलेत. या सगळ्या गोष्टी राजपूत सभ्यतेविरुद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
करणी सेनेशिवाय या सिनेमाला ब्राह्मण संघटना 'सर्व ब्राह्मण महासभे'नंही विरोध केला. महासभेच्या आरोपानुसार, मणिकर्णिका हा सिनेमा जयश्री मिश्रा यांच्या 'राणी' या वादग्रस्त पुस्तकावर आधारित आहे.