15 दिवसांत `या` 3 प्रसिद्ध अभिनेत्रींनी आत्महत्या करत संपवलं जीवन
या सगळ्याचा तपास पोलिस सध्या जोरात करत आहेत.
मुंबई : बंगालमध्ये पल्लवी डे आणि बिदिशा डे यांच्या आत्महत्येनंतर आणखी एका अभिनेत्रीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. गेल्या 15 दिवसांत तीन अभिनेत्रींनी अशा प्रकारे आत्महत्या केल्या आहेत. आता अजून एक अभिनेत्री मंजुषा नियोगी हिचा मृतदेह कोलकात्यातील पाटुली भागात घरात गळफासात लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. यापूर्वी पल्लवी डे आणि बिदिशा डे मजुमदार यांचेही मृतदेह गळफासावर लटकलेले आढळले होते.
मंजुषा आणि बिदिशा खूप जवळच्या मैत्रिणी असल्याचं बोललं जातंय. बिदिशाच्या मृत्यूने मंजुषाला खूप दु:ख झालं. मंजुषाच्या आईने सांगितलं की, दोन दिवसांपूर्वी तिची मुलगी तिची जवळची मैत्रीण बिदिशा हिच्या मृत्यूमुळे डिप्रेशनमध्ये गेली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, मृत्यूचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
आईने खोलीत डोकावलं असता बसला धक्का
मंजुषा ही झपाट्याने प्रसिद्धीच्या झोतात येणारी अभिनेत्री आणि मॉडेल होती. तिने अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं होतं. मात्र नुकतीच अचानक ही धक्कादायक घटना घडली. आणि सगळ्यांनाच धक्का बसला. शुक्रवारी सकाळी बराच वेळ मंजुषा खोलीतून बाहेर न आल्याने तिच्या आई-वडिलांनी चिंतेत पडून तिच्या मोबाईलवर कॉल केला. मंजुषाने फोन उचलला नाही तेव्हा त्यांनी मंजुषाची खोली उघडण्याचा प्रयत्न केला.
यानंतर तिने कसंतरी खिडकीतून मुलीच्या खोलीत डोकावलं असता तिच्या पायाखालची जमिनच सरकली. मंजुषाचा मृतदेह फासावर लटकलेला होता. याआधी 15 मे रोजी अभिनेत्री पल्लवी डे आणि 26 मे रोजी बिदिशाचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. पल्लवीच्या मृत्यूप्रकरणी तिचा लिव्ह इन पार्टनर साग्निक याला पल्लवीचा मानसिक आणि आर्थिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
या तिन्ही प्रकरणांचा पोलीस सखोल तपास करत आहेत. तिघांच्या मृत्यूचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याचाही शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कुठेतरी अभिनयाच्या किंवा मॉडेलिंगच्या दुनियेतील काही कारस्थानामुळे तिघांनी हे आत्मघाती पाऊल तर उचलले नाही ना? या सगळ्याचा तपास पोलिस सध्या जोरात करत आहेत.