मन फकिरा सिनेमाचा टीझर लाँच
सुव्रत - सायली नव्या सिनेमात
मुंबई : सुव्रत जोशी आणि सायली संजीव ही नवी जोडी 'मन फकिरा' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर लाँच झाला आहे. अरेंज मॅरेज करून लग्नबंधनात अडकलेल्या या जोडीच्या मनात नेमकं कोण असतं? हे या टीझरमध्ये पाहण्यासारखं आहे.
14 फेब्रुवारीला व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. या सिनेमात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
मृण्मयी देशपांडे या सिनेमाबद्दल सांगताना म्हणते की, ‘मन फकिरा’ हा ट्रेंड सेटिंग सिनेमा असून तो नातेसंबंधांवर भाष्य करतो आणि आजची पिढी ज्या नातेसंबंधांकडे खुल्या नजरेने पाहते त्याच्याबद्दल बोलतो. आजची युवा पिढी विशेषतः लग्न या नात्याकडे फक्त बंधन म्हणून न बघता त्याच्यापलीकडे जगायला शिकली आहे.'
पुढे मृण्मयी सांगते की,'मला वाटत आजच्या युवा पिढीसाठी लग्नाच्या व्याख्या बदलल्या आहेत ते एक बंधन न राहता त्या आणखीन खुल्या आणि प्रगल्भ झाल्या आहेत. केवळ बंधन न वाटता या माणसाबरोबर आयुष्य काढता येणं शक्य आहे का, हा प्रश्न पहिल्यांदा सोडवून मग या गणितामध्ये उतरण्याचा विचार ही युवा पिढी करते.'