मुंबई : शहरावर जेव्हा जेव्हा कोणतं संकट ओढवलं तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी मुंबई पोलीस तितक्याच तत्परतेने धावून आले आहेत. आपली जबाबदारी ओळखत कामाप्रती असणारी समर्पक वृत्ती आणखी बळावत ही मंडळी सातत्याने नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आली. गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसविरोधातील लढ्यातसुद्धा मुंबई पोलिसांची हीच भूमिका पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Coronavirus कोरोना विषाणूने देशात, राज्यात आणि मुंबईत सर्वाधिक थैमान घातलेलं असताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून सतत काम करणाऱ्या याच मुंबई पोलिसांप्रती प्रत्येकजण आभार व्यक्त करत आहे. 


शक्य त्या परिंनी पोलीसांप्रती ही निखळ भावना व्यक्त करत या रक्षणकर्त्यांना सलाम केला जात आहे. त्यातच आता मराठी कलाविश्वातील आघाडीचे अभिनेते अशोक सराफ आणि त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांनीही त्यांचं योगदान दिलं आहे. एका गोड मार्गाने या सेलिब्रिटी जोडीने मुंबई पोलिसांच्या सेवेत असणाऱ्या ओशिवरा येथील पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचे सहृदय आभार मानले आहेत. 


आभार मानण्यासाठी या जोडीने आधार घेतला आहे तो म्हणजे आमरस- पुरीचा. अगदी बरोबर वाचलं, आमरस- पुरीचा. घरातील कोणा एका खास व्यक्तीसाठी किंवा खास प्रसंगी सहसा असा गोडाचा बेत आखला जातो. असंख्य नागरिकांसाठी स्वत:च्या कुटुंबाला दूर सारणाऱ्या या पोलिसांच्या कार्याला आणि धाडसी वृत्तीला सलाम करण्यासाठी, या हक्काच्या कोरोना वॉरियर्सच्या कार्याला दुजोरा देण्यासाठीच सराफ दाम्पत्याने हे पाऊल उचललं आहे. 


अतिशय आपलेपणानं त्यांनी पोलिसांप्रतीच्या आपल्या भावना व्यक्त करत आमरस- पुरीच्या या बेताविषयी माहिती दिल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 



वाचा : 'इन्सानोंको कोरोना होता है, कोरोना इन्सान नही होता'


 


रितसर परवानगी घेत त्यानंतर खुद्द निवेदिता सराफ यांनी स्वत: आमरस- पुरी तयार करत त्या पोलीस ठाण्यात गेल्याची माहिती समोर येत आहे. आपल्याकडून आभार व्यक्त करण्यासाठी म्हणून करण्यात आलेला हा छोटासा प्रयत्न गोड मानून घ्या, असं ते अगदी आपलेपणानं पोलिसांना उद्देशून म्हणाले. अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांच्या या 'शॉल्लेट' अंदाजाला प्रेक्षकांनीही सलाम केला आहे.