Chinmay Mandlekar Receive Award : मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरला ट्रोलिंगला सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर चिन्मयने संताप व्यक्त करत यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे चिन्मय मांडलेकरचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीनानाथ मंगेशकर यांच्या 82 व्या पुण्यतिथी निमित्ताने बुधवारी २४ एप्रिल 2024 रोजी प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी मानाचा लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार महानायक अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला. तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्काराने गौरविण्यात आलं.  याच वेळी अभिनेता चिन्मय मांडलेकर लिखित, दिग्दर्शित ‘गालिब’ या नाटकाला उत्कृष्ट नाट्यनिर्मितीसाठी मोहन वाघ पुरस्काराने गौरवण्यात आले. उषा मंगेशकर यांच्या हस्ते चिन्मय मांडलेकरला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


चिन्मय मांडलेकर काय म्हणाला?


हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर चिन्मय मांडलेकरने त्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी त्याने प्रेक्षकांचे आभार मानले. यावेळी तो म्हणाला, सर्व मान्यवरांना नमस्कार, सभागृहात कर्तृत्वाने खूप मोठी असलेली माणसं आहेत, त्यांना सर्वांना प्रणाम. नाटकाला पुरस्कार मिळणं ही खूप गोष्ट आहे. यात संपूर्ण टीमची मेहनत आहे. आमच्या निर्मात्यांचे मी आभार मानतो. मी फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो की, भारतात जन्माला आलेल्या लहान मुलाच्या डीएनएमध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्रात जन्माला आलेल्या कुठल्याही मुलाच्या डीएनएमध्ये तीन नावं असतात. एक म्हणजे मंगेशकर, दुसरं म्हणजे बच्चन आणि तिसरं नाव मी महाराष्ट्रातील आहे ते म्हणजे सराफ.”


मला जेव्हापासून समजायला लागलं, तेव्हा मी ‘नमक हलाल’ हा पहिला चित्रपट पाहिला होता. ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट तर कमीत कमी 100 वेळा आम्ही सगळ्यांनी पाहिला आहे. त्यातूनच प्रेरणा घेऊन आज इथपर्यंतचा प्रवास केला आहे. जेव्हा कोणी विचारतं तू या क्षेत्रात का आला आहेस? तेव्हा या उत्तरात डीएनएमध्ये असलेली ही तीन नावं कारणीभूत आहेत. मंगेशकर, बच्चन आणि सराफ,” असे चिन्मयने यावेळी म्हटले. 



पत्नीनेही केले कौतुक


तर चिन्मयची पत्नी नेहानेही पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्यासाठी खास पोस्ट केली आहे. "तू माझा नवरा आहेस, याचा फक्त आणि फक्त अभिमान आहे. तुझ्यासारखा तूच चिन्मय. इतकं विनय, इतकी विनम्रता... हे सगळं तूच करू जाणे", अशा शब्दात तिने चिन्मयचे कौतुक केले आहे. 



दरम्यान मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून चिन्मय मांडलेकरला ओळखले जाते. त्याने नाटक, मालिका, चित्रपटात काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. मराठी चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत त्याने घराघरात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. तर ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये फारुख मल्लिक बिट्टा या खलनायकाची भूमिकाही त्याने उत्तमरित्या साकारली. सध्या तो गालिब या नाटकामुळे चर्चेत आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन चिन्मयने केले आहे.